बारामतीतील घनकचरा प्रकल्पास स्थानिक नागरिकांचा विरोध
या परिसरात सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प अगोदरच कार्यान्वित आहे.
बारामतीतील घनकचरा प्रकल्पास स्थानिक नागरिकांचा विरोध
या परिसरात सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प अगोदरच कार्यान्वित आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती गुनवडी, मळद, विश्वासनगर, समर्थनगर येथील रहिवाशांनी तेथे होऊ घातलेल्या घनकचरा प्रकल्पास विरोध दर्शविला आहे. या भागातील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने आज मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेत या प्रकल्पास तीव्र विरोध दर्शविला.
नगरपरिषदेकडून हद्दीतील सर्व्हे नंबर २६ व २७ पैकी आरक्षण क्रमांक ९० वर घनकचरा प्रकल्प केला जाणार असल्याची
कुणकुण लागताच शहरातील समर्थनगर, विश्वासनगर भागातील नागरिकांसह लगतच्या गुणवडी, मळद ग्रामपंचायतीने त्याला विरोध
दर्शविला आहे.
यासंबंधी शुक्रवारी (दि. १८) पालिकेला निवेदन देण्यात आले. विश्वासनगर, समर्थनगर या शहराच्या हद्दीतील नागरिकांसह गुणवडी व मळद ग्रामपंचायतींनी घनकचरा प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. या भागात प्रसिद्ध मारुती मंदिर आहे.
या भाग समर्थनगर, विश्वासनगर, वायसेवस्ती, बारामती हॉस्पिटल परिसर, गुनवडी व मळद गाव अशा परिसराचा असून जवळपास पाच ते सहा हजार लोकसंख्या या परिसरात आहे. या प्रकल्पामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यास हानी पोहोचू शकते, दुर्गंधी पसरून
घाणीचे साम्राज्य व रोगराई उद्भवू शकते.
नगरपालिकेने पुन्हा याच ठिकाणी घनकचरा प्रकल्प केल्यास या भागातील नागरिकांच्या दृष्टीने ही बाब धोकादायक ठरु शकते. याच
परिसरात एक पुरातन हनुमानाचे मंदिर असून लोकांच्या भावनाही निगडित आहेत.
या भागात पालिकेचा पूर्वीपासून सांडपाणी प्रकल्प आहे. शिवाय परिसरातून नदी, ओढा गेलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा याच भागात घनकचरा प्रकल्प नको, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. दरम्यान, मळद व गुणवडी ग्रामपंचायतीतर्फेही मुख्याधिकाऱ्यांना स्वतंत्र निवेदने देत या भागात घनकचरा प्रकल्प नको, अशी मागणी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही यासंबंधी निवेदन देणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.