महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ;दोन -तीन दिवसांत अनेक भागात पावसाची शक्यता!
आज महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट ;दोन -तीन दिवसांत अनेक भागात पावसाची शक्यता!
आज महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या अवकाळी पावसात द्राक्षबागा, गहू, हरभरा पिकं भूईसपाट झाली आहेत. तर पुढचे 2 दिवस उत्तर महाराष्ट्रात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. राज्यातील जवळपास सर्वच विभागात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. गुरुवारी उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस झाला. नाशिक तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काल मध्यरात्री पावसाने हजेरी लावली. दरम्यान वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.
अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. रात्री पडलेल्या अवकाळी पावसाने द्राक्षाला तडे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
निफाड तालुक्यातील चांदोरी परिसरात रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे फळबागा, कांदा आणि गव्हला मोठा फटका बसला. अनेक शेतक-यांनी रब्बी हंगामासाठी दुबार पेरणी केली होती. मात्र अवकाळी पवसाने काढणीला आलेलं पीक नष्ट केले.
गहू आणि कांदा पिक भुईसपाट
नाशिकच्या येवला तालुक्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने काढणीला आलेला गहू आणि कांदा पिक भुईसपाट झाले आहे. द्राक्षबागांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. आधीच अतिवृष्टीने खरीपाच्या पिकाचं नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पिकांच्या भरोशावर होता. मात्र अवकाळी पावसानं तेही हिरावून नेल्यानं बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.