
बारामतीत कृषी कायद्याविरोधात बंदला चांगला प्रतिसाद….
सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे
बारामती वार्तापत्र
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला बारामतीत महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दर्शविला आहे. बारामती येथील हुतात्मा चौकात जोरदार घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन करत निदर्शने केली.या आंदोलनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांसह घटक पक्ष व संघटनांनी सहभाग नोंदविला.
बारामती येथील हुतात्मा चौकात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष साधू बल्लाळ, काँग्रेसचे आकाश मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांच्या हस्ते बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान या आंदोलनात बारामतीत सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. येथील बाजार समिती, भाजी मंडई मार्केट, शहरातील बाजारपेठा बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.