शास्त्रीय ज्ञानाची कास धरल्यास फळ बागायतदारांना चांगले दिवस – डॉ.सोमकुंवर
इंदापूरमध्ये द्राक्ष, डाळिंब व पेरू विषयावर चर्चा सत्र संपन्न

शास्त्रीय ज्ञानाची कास धरल्यास फळ बागायतदारांना चांगले दिवस – डॉ.सोमकुंवर
इंदापूरमध्ये द्राक्ष, डाळिंब व पेरू विषयावर चर्चा सत्र संपन्न
इंदापूर : प्रतिनिधी
शेतकरी बांधवांनी धीर न सोडता शास्त्रीय ज्ञानाची कास धरल्यास फळ बागायतदारांना निश्चितच चांगले दिवस येतील असे प्रतिपादन राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी केले. मंगळवारी (दि.१५) इंदापूर येथील शहा सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित द्राक्षे, डाळिंब व पेरू चर्चासत्रामध्ये ते बोलत होते.
निसर्ग आणि कोरोना महामारीच्या अवकृपेमुळे द्राक्ष बागायतीमध्ये आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने केलेल्या शिफारशींचा अवलंब करून उत्पादन खर्चात बचत केल्यास भविष्यामध्ये द्राक्ष बागायतदारांना निश्चितच चांगले दिवस येतील. द्राक्षवेल व्यवस्थापन काटेकोरपणे केल्यास फलधारक डोळ्यांची निर्मिती होऊन आगामी फळ छाटणी हंगाम दिलासादायक होईल.
डाळिंब बागायतदारांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. ए. मराठे यांनी योग्य जमिनीची निवड, तेल्या मुक्त रोपे, एकात्मिक खत, पाणी व कीड-रोग नियंत्रण केल्यास उर्वरित अंश विरहित निर्यातक्षम डाळिंब उत्पादन घेण्यास शेतकर्यांना कोणतीही अडचण भासणार नाही असे सांगितले.
राज्यामध्ये पेरूच्या लागवडीखालील क्षेत्र लक्षात घेता शिफारशीत पेरू जातींचा वापर करून छाटणी तंत्रज्ञान अवलंबून उच्च प्रतीचे उत्पादन घेण्याचे बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राचे पेरू तज्ञ डॉ. पुरूषोत्तम हेंद्रे यांनी सांगितले.
उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती फळ बागायतदारांना देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र वाघमोडे यांनी शेतकऱ्यांना शेतीमधील अडचणींचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांची मदत घेऊन एकात्मिक शेतीचे आवाहन केले. द्राक्ष संशोधन केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ.अजय उपाध्याय व किटक शास्त्रज्ञ डॉ. बिपिन यादव यांनी अनुक्रमे माती-पाणी व कीड व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दिनेश बाबु यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास शेतकरी, अधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.