
बारामतीत पहिल्या STEM लॅबचे उद्घाटन
१२ लाख रुपयांच्या खर्चात ही लॅब उभारण्यात आली
बारामती वार्तापत्र
म.ए.सो. चे कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, बारामती येथे बारामतीतील पहिली STEM (Science, Technology, Engineering, and Mathematics) लॅब स्थापन करण्यात आली असून, २६ मार्च २०२५ रोजी तिचे उद्घाटन संपन्न झाले.
या विशेष प्रसंगी फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड चे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट श्री. राकेश बावेजा, गटशिक्षणाधिकारी श्री. निलेश गवळी, विस्तार अधिकारी श्री. संजय जाधव आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सहकार्याने १२ लाख रुपयांच्या खर्चात ही लॅब उभारण्यात आली आहे.
श्री. राकेश बावेजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “STEM लॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रयोगशील शिक्षणाची संधी मिळेल. भविष्यातील संशोधन व नवनवीन संकल्पनांसाठी ही लॅब उपयोगी ठरेल.”
STEM लॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळेल, जे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरेल.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा. मुख्याध्यापिका सौ. रोहिणी गायकवाड मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय आटोळे सर यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय श्री. साईराज खेडकर यांनी करून दिला.
यानिमित्ताने शाला समिती अध्यक्ष अजयजी पुरोहित, प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळा समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, स्थानिक सल्लागार समिती सदस्य राजीवजी देशपांडे, फनेंद्रजी गुजर आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक राजाराम गावडे, पर्यवेक्षक दिलीप पाटील, शेखर जाधव, जयश्री शिंदे, म.ए.सो. परिवारातील सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.