बारामतीत पोलीस निरीक्षकावर गोळीबार…
सुदैवाने या गोळीबारातून लांडे थोडक्यात बचावले.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्यावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आज लांडे हे सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका तपास कामासाठी गेले असता फलटण येथील संशयित आरोपींकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या गोळीबारातून लांडे थोडक्यात बचावले.
या घटनेचा तपास होता सुरू…
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरुन जाणाऱ्या सराफ व्यावसायिकाला अडवत त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून ११ लाख ६६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले होते. याबाबत व्यवसायिक अमर रंगनाथ कुलथे (रा.मोरगाव ता.बारामती) यांनी फिर्याद दिली होती. या घटनेचा महिनाभरापासून तपास सुरू होता.
संशयिताचा शोध घेत असताना गोळीबार…
दरम्यान वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडे यांना सदर घटनेतील संशयित माने नावाची व्यक्ती सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वडले गावात असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारावरून लांडे हे आपल्या सहकाऱ्यांंसह आज वडले येथे गेले असता त्यांच्यावर संशयितांनी गोळीबार केला. मात्र या गोळीबारात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. अशी माहिती बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.