बारामतीत सावत्र बापाकडूनच चिमुकलीवर बलात्कार
पोलिसांनी सावत्र बापाला ठोकल्या बेड्या
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातच बलात्काराची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सावत्र बापाने नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. ही घटना मोरगाव जवळील शेराचीवाडी येथे घडली असून या प्रकरणी तक्रार दाखल होताच वडगाव निंबाळकर पोलिसांनी सावत्र बापाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.
या प्रकरणी पीडितेच्या आईनं पोलीसात फिर्याद दिली असून त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि कारवाई करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी शेराचीवस्ती इथे हा धक्कादायक प्रकार समोर आला. या मुलीची आई जेजुरीची रहिवासी आहे.सध्या हे कुटुंब शेराचीवस्ती इथे भाड्यानं खोली घेऊन राहात होते. पीडित मुलीची आई या आरोपीची दुसरी पत्नी असल्याची माहिती मिळाली असून या आरोपीनं 9 वर्षांच्या मुलीवर जबरदस्ती करून कुणाला काही सांगितलं तर आईला जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष मुंढे, हवालदार संजय मोहिते यांनी नराधम सावत्र बापाला अटक केली आहे. सध्या चौकशी सुरू असून संतप्त स्थानिकांकडून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.