बारामतीमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची भर…

बारामतीमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची भर…
तीन जण बाहेरच्या तालुक्यातील तर एक शहरातील…
बारामती:-प्रतिनिधी
देशासह राज्यात ठिकठिकाणी करोना सारख्या महामारी चा प्रादुर्भाव वाढत होता. त्यावेळी अवघ्या काही दिवसातच बारामती ‘करोना मुक्त’ झाली होती. मात्र काही बेफिकीर नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे शहरात पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे.
आज दि. १० जुलै रोजी बारामतीत आज कोरोनाच्या रुग्णांची नोंद नव्याने झाली. यामधील एक रुग्ण हा कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथील असून तो तीन दिवसांपूर्वी उपचारासाठी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होता.
त्याची चाचणी करण्यात आल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली.
त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर येथेच उपचार सुरू आहेत.
दौंड तालुक्यातून येथे आलेल्या एका रुग्णासही कोरोनाची बाधा झाली असून तो कोरोनाबाधित होऊनच येथे आल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या कोरोनाग्रस्तांची नोंद मात्र नगर जिल्ह्यात व दौंड तालुक्यात गणली जाणार की, बारामतीत गणली जाणार याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.
बारामतीतील मोतानगर परिसरातील पुरूष रुग्ण हा नौदल भरती प्रक्रियेच्या निमित्ताने पुण्यात गेला असताना तिथे भरती प्रक्रियेचा भाग म्हणून त्याची कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली.
त्याला कोणतीही लक्षणे नाहीत, मात्र चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
एकूणच सहज प्रक्रियेचा भाग म्हणून केलेल्या तपासणीतही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बारामतीकरांसाठी ही चिंता करण्याचीच बाब आहे.
येथील परिसर सील करण्यात आला असून आरोग्य प्रशासनाकडून कार्यवाही सुरू आहे.दरम्यान या ३९ वर्षीय रुग्णावर रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान बारामतीतील एका दवाखान्यात शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णाची उपचाराचा भाग म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली.
खासगी प्रयोगशाळेतील तपासणीदरम्यान त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्याच्या शासकीय प्रयोगशाळेतील अहवालाची प्रतिक्षा आहे.
आज सकाळी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले असून संध्याकाळपर्यंत त्याचाही अहवाल येण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान आज दुसऱ्या दिवशीही बारामतीत मास्क न घालता फिरणाऱ्यांविरोधात नगरपरीषद व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली.
यामध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंडाची वसूली करण्यात येत आहे.