
बारामतीमध्ये ‘म्युकरमायकोसिस’चे १७ रुग्ण
बुरशीजन्य आजाराचे संकट
बारामती वार्तापत्र
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या बारामतीकरांवर आता कोव्हिडनंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आजाराचे संकट निर्माण झाले आहे.
बारामतीत या आजाराचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. करोना संसर्ग झाल्यावर उपचारांनंतर बऱ्या झालेल्या व्यक्तींना या आजाराचा
धोका संभावतो. ज्या रुग्णांना टोसिलीझुमॅब, रेमडेसिव्हिर इंजेक्शन दिले आहे किंवा पाच दिवसांपेक्षा अधिक काळ ऑक्सिजन दिला आहे, त्यांच्या नाकामध्ये म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
बारामतीत देखील पहिल्या लाटेपासून आतापर्यंत अंदाजे 20 रुग्णांना अशा स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जावे लागल्याची माहिती खुद्द वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली आहे.
वेळीच निदान झाले नाही किंवा उपचार मिळाले नाहीत, तर हा आजार बळावत जातो. परंतु काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव हा मागील वर्षाच्या नोव्हेंबर डिसेंबर पासून सुरू असल्याची माहिती खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. फक्त याविषयी उपचाराची कोणतीही वेगळी मार्गदर्शक सूचना नसल्याने काही रुग्ण तसेच नेहमीच्या पद्धतीने बरे होत आहेत,यातून रुग्णाचा जबडा किंवा डोळा काढावा लागू शकतो. प्रसंगी प्राणही गमवावा लागू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
दरम्यान आता सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला असल्याने, यावरती उपाय योजना सुरू होतील अशी चर्चा वैद्यकीय तज्ञ करत आहेत. दरम्यान बारामतीत देखील मागील दोन आठवड्यापासून तीन रुग्णांना म्युकर मायकॉसिस चा प्रादुर्भाव झाला असल्याची माहिती सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे यांनी दिली.
यासाठी दवाखान्यांमध्ये ऑक्सीजनवर किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाच्या ह्युमिडीफाईर मध्ये फक्त डिस्टिल्ड वॉटर भरावे, साधे पाणी भरू नये, कारण साध्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया असतात व तेच पुन्हा बुरशी मध्ये परावर्तित होऊ शकतात. तसेच जे डिस्टिल्ड वॉटर भरले जात आहे, ते नियमित व सातत्याने बदलत जावे, जेणेकरून बुरशी श्वासावाटे जाणार नाही व काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या येथे टाळता येऊ शकेल असेही त्यांनी स्पष्ट केले
“ म्युकोरमायकॉसिस हा आजार दुर्मीळ असला तरी नवा नाही. वेळीच तपासणी व उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. त्यासाठी रुग्णांनी लक्षणे दिसताच डोळ्यांचे डॉक्टर किंवा कान, नाक व घसा तज्ज्ञाच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.
-डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय.
“ म्युकर मायकॉसिसची बारामतीत नोंद नाही; परंतु काळजी घेण्याची गरज : डॉ. मनोज खोमणे
दरम्यान या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी बारामतीत अद्याप म्युकरमायकॉसिस चा रुग्ण आढळल्याची नोंद आमच्याकडे नाही असे स्पष्ट केले, अर्थात राज्यात आढळत असलेल्या काळ्या बुरशीच्या या रुग्णसंख्येचा विचार करता बारामतीत देखील काळजी घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
“ डोळे जळजळ करणे, डोळे लाल होणे, डोळे दुखणे अशी लक्षणे सुरुवातीच्या काळात आढळून येतात. मात्र, योग्य वेळी तपासणी व उपचार घेतल्यास हा आजार बरा होतो. अधिक संसर्गानंतर काही रुग्णांमध्ये डोळा गमावण्याची शक्यता असते. – डॉ. सचिन पांढरे, नेत्रविभाग प्रमुख, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय
“ म्युकोरमायकॉसिस हा नवीन आजार नाही. करोनानंतर रुग्णांमधील रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने या आजाराचा संसर्ग झपाट्याने होत असल्याचे समोर आले आहे. नाकातून किंवा तोंडातून हा बुरशीचा संसर्ग होतो. या संसर्गगाकडे दुर्लक्ष केल्यास तोंड,
डोळे, जबडा यातून पुढे मेंदूपर्यंत जाऊन तीव्र आघात करतो. त्यामुळे वेळेत तपासणी व उपचार करावेत. – डॉ. वैभव मदने कान, नाक, घसा तज्ज्ञ