बारामती शहरानंतर आता ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. आज लोणीभापकर येथील एक कोरोना रुग्णामुळे बारामतीतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. लोणी भापकर येथील ७० वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला घाटकोपर येथुन लोणी भापकर येथे १९ मे रोजी आली होती. तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये तिचा अहवाल पाँझिटिव्ह आला.आता प्रशासनाने लोणी भापकर महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी लाॅकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर ठेवावे व सॅनिटाझरचा वापर करावा.