बारामती तालुक्यातील कऱ्हावगज भागात भरदिवसा घरफोडी करुन ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास
घरातली मंडळी शेतात कामासाठी गेले असताना चोरट्यांनी मुद्देमालावर मारला डल्ला
बारामती तालुक्यातील कऱ्हावगज भागात भरदिवसा घरफोडी करुन ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास
घरातली मंडळी शेतात कामासाठी गेले असताना चोरट्यांनी मुद्देमालावर मारला डल्ला
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कऱ्हावगज भागात दिवसाढवळ्या घराची कुलूपं तोडून अज्ञात चोरट्यांनी २८ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.
कऱ्हावगज येथील, मच्छिंद्र बनकर आणि गोरख बनकर हे सख्खे भाऊ शेजारी शेजारी राहतात. घरातील सर्व लोक हरभरा तूर खुरपण्यासाठी शेतात गेली होती. मच्छिंद्र बनकर घरी होते मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शेळ्यांना चारा आणण्यासाठी ते देखील रानात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 15 तोळ्यापेक्षा जास्त दागिने चोरून नेले.
तसेच, घरासमोरच राहणारे त्यांचे भाऊ गोरख बनकर यांच्या देखील घराचे कुलूप कटावणीने उचकटून तीन गंठण, अंगठ्या, राणीहार, सोनसाखळ्या असा जवळपास 18 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. गोरख आणि मच्छिंद्र बनकर यांचे दोघांचे मिळून जवळपास 28 ते 30 तोळे सोन्याचे दागिने चोरट्याने पळविले आहेत. दोघेही बंधू टेलिफोन खात्यातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे मिळालेल्या पैशातून त्यांनी सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, दिवसाढवळ्या चोरट्यांनी घरफोडी करत सर्व सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.
यासंदर्भात घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्यासह पोलिस पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पडताळणीचे काम सुरू आहे. याप्रकरणी फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आल्याची माहिती महेश ढवाण यांनी दिली.