बारामतीच्या धर्तीवर इंदापूर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाने क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी
मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

बारामतीच्या धर्तीवर इंदापूर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाने क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी
मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
बारामतीच्या धर्तीवर इंदापूर मध्ये देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी कडून करण्यात आली आहे. सदरील मागणीचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याकडे मंगळवारी (दि.२९) देण्यात आले.
इंदापूर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेट हा खेळ खेळण्यात येतो. परंतु उदयोन्मुख खेळाडूंना आद्यवत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने तसेच पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने खेळाडूंची गैरसोय होत आहे. वास्तविक पाहता पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असणारे इंदापूर शहर गेल्या दहा वर्षांपासून झापाट्याने वाढत आहे. पूर्वेला काही किलोमीटरवर उजनी धरण आहे. तर पश्चिमेला औद्योगिक वसाहत आहे.त्याच बरोबर शिक्षण व आरोग्य विषयक सुविधांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कामानिमित्त किंवा अन्य कारणाने बाहेरून या ठिकाणी आलेले नागरिक स्थायिक होण्याची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाढत असलेल्या लोकसंख्येनुसार सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असून खेळाडूंसाठी या ठिकाणी आद्यवत क्रिकेट स्टेडियम उभे राहिल्यास क्रिकेटपटूंच्या तसेच इतर खेळाडूंचे कौशल्य विकसित होण्यासाठी तसेच इंदापूर तालुक्याचे नाव लौकिक वाढवण्यास उपयुक्त ठरेल.
इंदापूर नगरपरिषदेच्या सन २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात क्रिकेट स्टेडियम प्रस्तावित
इंदापूर नगरपरिषदेच्या सन २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात शहरांमध्ये क्रिकेट स्टेडियम व स्विमिंग पूलासाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यासाठी ५ कोटी खर्च करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे बारामतीच्या धर्तीवर इंदापूर मध्ये देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाने क्रिकेट स्टेडियम उभे राहिल. अशी अपेक्षा इंदापूरकरांची नक्कीच आहे.