बारामती तालुक्यातील शिर्सुफळ मध्ये गिधाडे पाहण्याची संधी
अनेक भागातून पर्यटक, छायाचित्रकार सफारीला भेटी देत आहेत.

बारामती तालुक्यातील शिर्सुफळ मध्ये गिधाडे पाहण्याची संधी
अनेक भागातून पर्यटक, छायाचित्रकार सफारीला भेटी देत आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती वनपरिक्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर माळराने व वन्यप्राणी आहेत. पुणे वनविभागाने राज्यात सर्व प्रथम पर्यटकांसाठी खुल्या करून दिलेल्या ग्रासलॅन्ड सफारी शिर्सुफळ झोन मध्ये नुकतेच इंडियन वल्चर (भारतीय गिधाड) आणि इजिप्शियन वल्चर (पांढरे गिधाड) हे स्थलांतरीत पक्षी आढळून आले आहेत.
ते पाहण्यासाठी अनेक भागातून पर्यटक, छायाचित्रकार सफारीला भेटी देत आहेत. पर्यावरणाचा स्वच्छता रक्षक म्हणून गिधाड पक्षांना ओळखले जाते. गिधाडे प्रामुख्याने डोंगरातील कड्यांवर तर काही ठिकाणी झाडांवरही घरटे बनवतात.
त्यांची नजर अतिशय तीक्ष्ण असते. मेलेली जनावरांचे मांस खाऊन ते त्यावर उपजीविका करतात. २००२ सालापासून त्यांना आय यु सी एन यादीत गंभीरपणे धोक्यात आलेल्या प्रजातीमध्ये सूचीबद्ध केले गेले आहे.
“ग्रासलॅन्ड सफारी शिर्सुफळ मध्ये अनेक प्रकारचे शिकारी पक्षी, स्थलांतरीत पक्षी तसेच तरस, लांडगा, खोकड, सायाळ, कोल्हा इ. सस्तन प्राण्यांची शृंखला अनुभवण्यासाठी पर्यटक, छायाचित्रकार महाराष्ट्र तसेच देश विदेशातून पर्यटक ऑनलाइन बुकिंग करून येतात. त्यामुळे शासनाला महसूल जमा होण्याबरोबरच स्थानिक गाईड यांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
इच्छुक पर्यटकांनी www.grasslandsafari.org या वेबसाईट वर बुकिंग करावे.” किंवा बारामती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना भेटून रीतसर नोंदणी करण्याचे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती. अश्विनी दा. शिंदे बारामती यांनी केले आहे.