बारामती तालुक्यातील सांगवी शाळेची पोरं हुश्शार !
बारामतीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेले गौरवोद्गार

बारामती तालुक्यातील सांगवी शाळेची पोरं हुश्शार !
बारामतीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेले गौरवोद्गार
सांगवी :- प्रतिनिधी
बारामती तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा श्री निलेश गवळी साहेब यांनी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगवीस भेट देऊन गुणवत्तेची सखोल पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांचे वाचन-लेखन, मुलभूत गणितीय क्रिया, व्यवहार ज्ञानावर आधारित उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पडताळणी करतानाच गुणवंत विद्यार्थ्यांचे गोष्टींची पुस्तके देऊन सन्मान केला. मा.गटशिक्षणाधिकारी साहेबांनी केलेल्या सन्मानाने मुले आनंदून गेली. प्रथमच गटशिक्षणाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली.
खास करून इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीच्या तिन्ही वर्गांस सखोल भेट देऊन विविध उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगून , सोडवून घेत त्यांच्या शंकेचे निरसनही केले.येत्या ९ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत चांगली कामगिरी करून गुणवत्तायादीत येण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेतून संवाद साधत आपल्या परकीय भाषा शिक्षणाची चुणूक दाखवून दिली.
नुकत्याच झालेल्या नवोदय परीक्षेत प्रामाणिकपणाची व अभ्यासवृत्तीची चुणूक दाखविणाऱ्या कु.श्रेया निलेश दोरगे , कु. आदिती प्रवीण फडतरे यांचा तसेच जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेमध्ये उंचउडी, लांबउडी व 100 मीटर धावणे या तीनही खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या चि.शार्दुल चंद्रसेन क्षीरसागर याचाही गोष्टीचे पुस्तक व गुलाबपुष्प देवून सन्मान केला.
यापुढेही दर्जेदार गुणवत्ता राखली जावी व उत्तरोत्तर त्यामध्ये आणखी वाढ व्हावी. गुणवत्तावाढीचे विविध उपक्रम यशस्वीपणे आणि नाविन्यपूर्णरित्या राबवावेत यासाठी शिक्षकांनाही शुभेच्छा दिल्या !!अशी कौतुकाची थाप विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या पाठीवर टाकणारे अधिकारी लाभल्याने शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. यामुळे निश्चितच आणखी दर्जेदार गुणवत्ता देण्यासाठी शिक्षकांचे मनोबल उंचावले आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री नितीन तावरे यांनी मा श्री निलेश गवळी साहेब व विस्ताराधिकारी मा श्री नवनाथ कुचेकर साहेब यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक मा श्री संजय गायकवाड यांनी आभार मानले.