बारामती त दारूची तहान भागवली दुधावर
पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक
बारामती वार्तापत्र
थर्टी फर्स्ट च्या नावाखाली तरुणाईचा रस्त्यांवर हॉटेलात ,चौकाचौकात चाललेला धिंगाणा ही नित्याचीच बाब झाली होती. मात्र पोलिस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या संकल्पनेनुसार दारू नको दूध पिऊया चा सकारात्मक परिणाम झाल्याचे चित्र बारामतीत दृष्टीस पडले त्यामुळे बारामतीतील तरुणांच्या आई-वडिलांनी नामदेवराव शिंदे यांचे आभार मानले.
थर्टी फस्ट ला दरवर्षी अपघात होणे वेगवेगळ्या प्रकारचे मारामारी किंवा इतर प्रकारचे गुन्हे दाखल होणे असा प्रकार असायचा. मात्र यावर्षी बारामतीत एकही गुन्हा व एकही अपघात घडला नाही हे विशेष मानावे लागेल.
स्वतः नामदेवराव शिंदे पेट्रोलिंग करत ड्रंक अँड ड्राइव्ह ची वाहने तपासत होते. पोलीस विभागातील सर्व पोलीस या कामगिरीवर विभागण्यात आले होते. विना अपघात विना गुन्हा त्यामुळे आजच्या उपक्रमाची चर्चा सर्व बारामती व परिसरात दिवसभर चर्चिली जात होती
दारू नको दूध पिऊया या उपक्रमांमध्ये सुमारे सात हजार लिटर मसाला दूध तरुणांनी नागरिकांना वाटप केले. कोणतीही गर्दी न करता रात्री बारा एक पर्यंत शहरात चालणारा गोंगाट यावेळी मात्र साडेदहाला सामसूम झाली होती.
या उपक्रमात लिमटेक मळद गुणवडी डोरलेवाडी गावातील तरुण मंडळांनी ,सामाजिक संस्थानी भाग घेतला होता. तांदुळवाडी वेस ,देसाई इस्टेट ,तीन हत्ती चौक, पुनावाला गार्डन ,बस स्टॉप डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ,कारभारी सर्कल, माळेगाव कॉलनी, गुणवडी, मळद, अशा 35 ठिकाणांवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या उपक्रमात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता तसेच रिक्षावाल्या संघटनांचाही सहभाग होता.
पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यापूर्वी ज्या पोलिस स्टेशनला काम केले आहे. त्याठिकाणी देखील हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो.
या कार्यक्रमाला हुपरी येथील विक्रमसिंह घाटगे, पंढरपूरहून पंकज कोळी, मंगळवेढा येथून नवनाथ अंकुश ,किरण पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आले होते. त्या कार्यक्रमात डीजे डॉल्बी सिस्टीम असा कोणताही वापर नसल्यामुळे यंदाचा थर्टी फर्स्टचा जल्लोष संस्कृतीचे जतन करत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ज्या ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी स्वतः नामदेवराव शिंदे यांनी जाऊन उपक्रम राबविणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांना मार्गदर्शन करून त्यांचा सत्कारही पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला .