बारामती नगर परिषदेने केलेल्या भरमसाठ भाडेवाढी विरोधात गाळेधारक संघटना आक्रमक….
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेणार भेट.
बारामती नगर परिषदेने केलेल्या भरमसाठ भाडेवाढी विरोधात गाळेधारक संघटना आक्रमक….
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेणार भेट….
प्रतिवर्ष 5 टक्के भाडेवाढ…45 टक्के भाडेवाढ कमी करावी
बारामती वार्तापत्र
कोरोनामुळे गेली दोन वर्षे व्यवसाय अडचणीत असतानाही बारामती नगरपरिषदेने त्यांच्या मालकीच्या गाळ्यांचे भाडे वाढविले आहे. उद्योग भवनातील गाळ्यांमध्ये कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नसताना जाचक भाडेवाढ केली असून त्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी सांगितलंय..
बारामती नगरपरिषदेने यापूर्वी २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी १५ टक्के भाडे वाढवले होते. त्रिसदस्यीय समितीने ठरविलेल्या मुल्यांकन दरानुसार ही आकारणी कऱण्यात आली होती. २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी त्रिसदस्यीय समितीने ठरवून दिलेल्या भाडे आकारणीनुसार पालिकेने भाडे आकारणी करण्याचा विषय यापूर्वीच सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे भाडे वाढले असून त्याचा बोजा गाळेधारकांवर पडला आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे व्यवसायाची स्थिती खालावली. त्यात गेली वर्षभर लाॅकडाऊनच्या कारणामुळे गाळे बंदच राहिले. शहरात पालिकेच्या मालकीचे काॅम्प्लेक्स, शाॅपिंग सेंटर, उद्योग भवन,शाहु काॅम्पलेस, गणेश मार्केट भवन आहेत. या गाळ्यांची अवस्था फारशी चांगली नाही. या सर्व इमारती पावसात गळतात. अनेकदा मागणी करूनही वाॅटर प्रुफिंग केलेले नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहे नाहीत. सार्वजनिक वीजेची व्यवस्था नाही. स्वच्छतेसाठी सफाई कर्मचारी नेमण्यात आलेला नाही. कोणत्याही भवनामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. गाळ्यांसमोर छोट्या व्यावसायिकांनी, हातगाडीवाल्यांनी अतिक्रमणे केली आहेत. त्याचा परिणाम गाळेधारकांच्या व्यवसायावर होतो. अशी स्थिती असताना भाडेवाढ अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
याबाबत गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र जाधव म्हणाले, सन २०१३ पासून पालिकेकडून प्रतिवर्षी ५ टक्के भाडे वाढ होत आहे. मागील पंचवार्षिकच्या नगरसेवकांच्या कालावधीत भाडेवाढीचा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तहकूब ठेवला होता. कोविड काळात गाळे बंद असतानाही पालिकेने भाडे वाढ केली आहे. यासंबंधी पवार यांची भेट घेणार असून येथील दुरवस्थेची माहिती त्यांना संघटनेकडून देण्यात येणार आहे.