बारामती नगर परिषद च्या मालकीचे रखडलेले गाळयांचे लिलाव कधी होणार ?
लिलावा अभावी बुडतोय लाखो रुपयांचा कर

बारामती नगर परिषद च्या मालकीचे रखडलेले गाळयांचे लिलाव कधी होणार ?
लिलावा अभावी बुडतोय लाखो रुपयांचा कर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याकडे लक्ष घालण्याची नागरिकांमधून होत आहे मागणी.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेचे कचेरी समोरील उद्योग भवन जवळपास सहा ते सात वर्ष कालावधी लोटला असून या उद्योग भवनातील गाळे, हॉलचे अद्याप लिलाव झालेले नाहीत या उद्योग भवनात सध्या मानसिक तसेच अवैद्य प्रकारही चालू आहेत. परंतु या बाबीकडे प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे लक्षण नसल्याने शहरातील नगरपालिकेच्या विविध उद्योग भवनातील किमान दोनशे गाळ्यांचा लिलाव रखडला असून नगरपालिकेस हे लिलाव करण्यास सवडच नाही असे दिसून येत आहे. बारामती नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे यानिमित्ताने पाहावयास मिळत आहे.
माजी कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या माध्यमातून बारामती मधील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी येत असतो. या निधीच्या माध्यमातून बारामती चा सर्वांगिक विकास होणे अपेक्षित असते परंतु प्रशासनातील काही गाफील अधिकाऱ्यांमुळे विकासाला खीळ बसण्याचे काम होत असते. नगरपालिकांच्या गाळ्यांचे लिलाव करण्यात दिरंगाई करणारे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर कोणत्या प्रकारची कार्यवाही होते याकडे समस्त बारामतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
नगरपालिकेचे शुल्क व अनामत रक्कम भरण्याची ही नागरिकांची तयारी असतानाही नगरपालिका या गाळ्यांचा निलाव का करत नाही हे एक अनुत्तरीत प्रश्नच आहे. बारामती येथील आंबेडकर स्टेडियम कचेरी समोरील उद्योग भवन, फिश मार्केट, गणेश मंडई यासह इतरही अनेक ठिकाणी गाळ्यांचे लिलाव झालेले नाहीत. कोरोनाच्या महामारी नंतर थोड्याफार प्रमाणात बाजारपेठा खुल्या झाल्या असून व्यापाऱ्यांच्या हाताला काम नाही. त्यातच बारामती नगरपालिकेचे गाळ्यांचे लिलाव थांबल्याने सर्वसामान्य जनतेला एखादा व्यवसायही करता येत नसल्याने बारामती येथील व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी असून या गोष्टीकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी लक्ष घालून या गाळ्यांचे लिलाव त्वरित करावेत अशी मागणी सध्या बारामती जोर धरु लागली आहे.
याबाबत बोलताना सुनील सस्ते विरोधी पक्षनेते बारामती नगरपालिका यांनी सांगितले की नगरपालिकेने गेले अनेक वर्ष गाळ्यांचे लिलाव न केल्याने नगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून या प्रक्रियेस तत्कालीन मुख्याधिकारी जबाबदार असून याबाबत आपण लवकर दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.