बारामती पोलीस ॲक्शन मोडमध्ये; फुटपाथवरून दुचाकी चालवल्यास होणार कारवाई; बारामती पोलिसांचा इशारा
वाहनचालकांवर होणार कठोर कारवाई

बारामती पोलीस ॲक्शन मोडमध्ये; फुटपाथवरून दुचाकी चालवल्यास होणार कारवाई; बारामती पोलिसांचा इशारा
वाहनचालकांवर होणार कठोर कारवाई
बारामती वार्तापत्र
बारामतीतील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, अपघातापासून नागरीकांचा बचाव व्हावा, नागरिकांना सुरक्षित चालता यावे यासाठी बारामती शहरात ठिकठिकाणी फुटपाथ तयार करण्यात आले आहेत.
मात्र या फुटपाथवरून दुचाकी वाहने चालवण्यात येत आहेत अशा तक्रारी प्राप्त आहेत, ही बाब चुकीची आणि बेकायदेशीर असल्याने आता अशा दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
बारामती शहरातील बेशिस्त वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये रस्त्यावर विक्रेत्यांकडून करण्यात आलेली व्यावसायिक अतिक्रमणे, रस्त्यावर अस्ताव्यस्त लावण्यात येत असलेली वाहने आदींवर कायदेशीर कारवाया करण्यात आल्या आहेत. शिवाय गर्दीच्या ठिकाणी असलेल्या वाहनांना एका रेषेत पार्क करण्यासाठी नायलॉन दोरीचा प्रभावी उपक्रम पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला आहे. त्यामुळे बारामती शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणांनी मोकळा श्वास घेतला आहे.
पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा
शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात मोकाट दुचाकी घेऊन टुकारगिरी करणाऱ्या तसेच फटाका सायलेंसर असलेल्या दुचाकीवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तुटलेल्या, अस्पष्ट, फॅन्सी व विना क्रमांकाच्या वाहणांवरही वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करून अशा वाहनांवर चक्क सरकारी नियमाप्रमाणे सवलतीच्या दरात नंबर प्लेट लावण्याचा अनोखा उपक्रम बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी राबवलेला आहे. असे असताना आता नव्याने तयार करण्यात आलेल्या फूटपाथवर लक्ष घालून वाहतुक पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
…तर अशा वाहनचालकांवर होणार कठोर कारवाई
नव्याने तयार करण्यात आलेल्या फुटपाथवरून वाहन चालवल्यास अथवा टुकारगिरी करत अतिवेगाने वाहने चालवल्यास त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तसेच नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती वाहतूक पोलिसांना ९९२३६३०६५२ या क्रमांकावर द्यावी, अथवा ११२ वर कॉल करून याबाबतची माहिती द्यावी. अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाईल.
– चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा.
हेही वाचा :Baramati Crime News: बारामतीत कचरागाडीने माजी उपनगराध्यक्षांना दिली धडक; मद्यधुंद चालकाचा प्रताप
बारामती नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा ज्योती नवनाथ बल्लाळ यांच्यासह इतर दोन महिलांना बारामती नगरपालिकेच्या मद्यधुंद चालकाने कचरा संकलन करणाऱ्या गाडीने ठोकल्याची घटना बारामतीत घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी सुनीता लोंढे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, बारामतीच्या माजी उपनगराध्यक्षा ज्योती नवनाथ बल्लाळ या बारामती शहारातील गणेश भाजी मार्केटमध्ये संक्रांतीची खरेदी करीत असताना नगरपालिकेच्या ठेक्यावर असलेल्या एनडीके नामक कंपनीच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीच्या चालकाने मागे खरेदी करीत उभ्या असलेल्या माजी उपनगराध्यक्षा आणि त्यांच्या इतर दोन महिला सहकारी यांना कचरा संकलन करणारी गाडी रिव्हर्स घेऊन ठोकरले.