बारामती बाजार समितीमध्ये तुर हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ
रू. ७,५५०/- या हमीदरा नुसार तुर खरेदी

बारामती बाजार समितीमध्ये तुर हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ
रू. ७,५५०/- या हमीदरा नुसार तुर खरेदी
बारामती वार्तापत्र
बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये आज दि. १८ मार्च २०२५ रोजी बारामती मुख्य आवारातील यांत्रिक चाळणी येथे शासना मार्फत नाफेड व जिल्हा मार्केटींग फेडरेशन यांचे वतीने हमीभाव तुर खरेदी केंद्राचा शुभारंभ सभापती विश्वास आटोळे यांचे हस्ते करण्यात आला. हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाच्या पीएसएस योजने अंतर्गत दि. २४/०१/२०२५ पासुन जिल्हा मार्केटींग फेडरेशन, पुणे यांनी कळविले नुसार हमीभावाने शेतक-यांची तुर खरेदी करणे करिता ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करणेत आली आहे.
ज्या शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली अशा शेतक-यांनी तुर आणुन खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे यांनी केले आहे.
तूर खरेदी पूर्ण जिल्ह्यात फक्त बारामती येथे सुरु झाले असून संपूर्ण पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान उपसभापती खलाटे रामचंद्र यांनी केले.
केंद्र शासनाने ठरवुन दिलेल्या रू. ७,५५०/- या हमीदरा नुसार तुर खरेदी करणेत येणार आहे. शुभारंभाचे पहिल्या दिवशी इनामगाव (ता. शिरूर जि. पुणे ) येथील शेतकरी दिलीपराव मोकाशी, संग्राम मोकाशी, गोपाळराव मोकाशी,अमरसिंह मोकाशी, सुरेखा मोकाशी या शेतक-यांची ४० क्विंटल तुर खरेदी करणेत आली.
नोंदणी सुरू झाल्यापासुन आत्तापर्यन्त ४५ शेतक-यांनी नाव नोंदणी केली आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे जमिनीचा ७/१२ उतारा व त्यावर तुरीची नोंद असलेला सन २०२४-२५ पिकपेरा, आठ-अ, आधारकार्ड आणि IFSC कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी संपुर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांची तुर खरेदी करणेत येणार असल्याने मुदतीत शेतक-यांनी नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या शेतक-यांना खरेदी वेळी एसएसएम द्वारे कळविणेत येईल, त्याच तारखेला तुर आणावयाची आहे. खरेदी केंद्रावर तुर आणताना शासनाचे निकषा प्रमाणे एफ.ए.क्यु. दर्जाची, स्वच्छ व वाळवुन आणावी.
तुरीची तपासणी करून स्वच्छ व वाळलेली तुर खरेदी करणेत येईल अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.
ज्या तुर उत्पादक शेतक-यांना नाव नोंदणी करावयाची आहे त्यांनी २२ मार्च २०२५ पर्यन्त बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक बारामती येथे ऑनलाईन नाव नोंदणी करावयाची आहे असे आवाहन निरा कॅनॉल संघाचे चेअरमन सतिशराव काकडे यांनी केले आहे.
यावेळी निरा संघाचे अधिकारी सुरेश काकडे, अमोल कदम, प्रशांत मदने तसेच बाजार समितीचे सुर्यकांत मोरे उपस्थित होते.