हर्षवर्धन पाटील यांचे इंदापुरात धरणे आंदोलन ; वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी
राज्यमंत्री भरणेंवर केली जहरी टीका

हर्षवर्धन पाटील यांचे इंदापुरात धरणे आंदोलन ; वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी
राज्यमंत्री भरणेंवर केली जहरी टीका
इंदापूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याने इंदापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध गेली तीन-चार दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने शेतीचे नुकसान वाढत चालल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी शनिवार (दि.२७) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्याच्या शेजारील तालुक्यांमध्ये शेतीचा वीजपुरवठा सुरू आहे, मग इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय का? इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेले मंत्री हे वीज पुरवठा सुरु करणेबाबत एकही शब्द बोलत नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही,अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री भरणे यांच्यावर वीज खंडित प्रश्नावर भडिमार केला. मी तुमचाच आहे, काही अडचण असेल तर मी सोडवीन असे तोंडावर गोड बोलणाऱ्या भरणे यांना शेतकऱ्यांचे होणारे नुकसान दिसत नाही का ? लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी ते टाळत आहेत, अशी टीका बेमुदत धरणे आंदोलन प्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी केली. महावितरणने शेतकऱ्यांना दिलेली बिले जास्त आलेली असून अनेक हॉर्स पावरने वाढवून दिलेली आहेत. त्यामुळे चुकीची दिलेली बिले दुरुस्त करावीत व बिल दुरुस्तीसाठी कक्ष उघडावेत. शासनाने वीज बिलामध्ये मोठी सवलत द्यावी व सवलत देय रक्कम भरण्यासाठी टप्पे पाडून दिल्यास शेतकरी बिल भरण्यात सहकार्य करतील, असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
यावेळी अँड.कृष्णाजी यादव, विलासराव वाघमोडे, बाबासाहेब चवरे, शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, देवराव जाधव, निवृत्ती गायकवाड, मोहन दुधाळ, गजानन वाकसे, रमेश खारतोडे, रणजीत पाटील, भाऊसो चोरमले, राजेंद्र पवार, नेताजी लोंढे, महादेव गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केली.