बारामती शहरात लॉकडाउन होणार नाही.
सध्या तरी कोणताही विचार नाही दादासाहेब कांबळे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात लॉकडाउन होणार, अशा स्वरुपाच्या बातम्या पसरविल्या जात असून, अशा प्रकारे कोणतेही लॉकडाउन करण्याचा प्रशासनाचा सध्या तरी कोणताही विचार नाही, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा नव्याने लॉकडाउन होण्याची शक्यता असल्याचे काही मॅसेज समाजमाध्यमांवर फिरत आहे, त्या शिवाय फोनवरूनही अनेक लोक चौकशी करत आहेत. या पार्श्वभूमीवर दादासाहेब कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॉकडाउनची शक्यता फेटाळून लावली. रुग्ण संख्या वाढू लागल्याने पुन्हा बारामतीत लॉकडाउन होईल किंवा दुकानांच्या वेळा अजून कमी केल्या जातील, अशा स्वरुपाची चर्चा बारामतीच्या व्यापारपेठेत सुरु आहे.
दादासाहेब कांबळे यांनी मात्र असे लॉकडाउन करण्याचा सध्या तरी कोणताही विचार नाही किंवा दुकानांच्या वेळातही सध्या तरी काही बदल केला जाईल, अशी शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, दुकानदारांनी संध्याकाळी पाच वाजता दुकाने बंद करणे आवश्यक आहे. अनेक दुकानदार पाचनंतरही दुकाने सुरु ठेवतात, काही विशिष्ट दुकानदारांबाबतच या विषयीच्या तक्रारी आहेत. याबाबत असे प्रकार निदर्शनास आले तर कारवाई होईल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
सहकार्य करण्याची गरज
बारामती शहरात अनेक ठिकाणी कोरोनाचे संकट दूर झाले आहे, अशा थाटात लोक गर्दी करताना दिसत आहेत. कोरोनाचे संकट बारामतीवर अधिक गडद होत असताना प्रत्येक बारामतीकराने काळजी घेण्याची गरज आहे. प्रत्यक्षात व्यवहारांना मान्यता दिल्यानंतर होणारी गर्दी धडकी भरवणारी आहे. बारामतीकरांनीच ही गर्दी टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक काम असल्यासच बाहेर पडावे, ज्येष्ठ नागरिक व मुलांना शक्यतो घराबाहेर पडू देऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे