बारामती शहरात शनिवारी पावसाची दमदार हजेरी
शहरातील गर्दी सायंकाळी कमी होत असल्याने ऐन पावसाचा परिणाम बाजारावर पाहायला मिळत आहे.

बारामती शहरात शनिवारी पावसाची दमदार हजेरी
शहरातील गर्दी सायंकाळी कमी होत असल्याने ऐन पावसाचा परिणाम बाजारावर पाहायला मिळत आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहर आणि तालुक्यात सलग दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन दिवसांपासून पडत
असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. सायंकाळी सहानंतर जवळपास दोन तास पाऊस होत
आहे. शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
सखल भागात पाणी साचले असून, ग्रामीण भागातील ओढे-नाले वाहू लागले आहेत. जून ते सप्टेंबर यादरम्यान सरासरीएवढाही पाऊस बारामतीत झाला नव्हता. मात्र, ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा आनंदला आहे. सोयाबीन आणि बाजरीचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरीही उसासह तरकारी पिकांना हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.
शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच दैना केली. शहराच्या आजूबाजूसह
सोमेश्वरनगर, माळेगाव, शारदानगर, पणदरे, तांदूळवाडी, जळोची, रुई तसेच औद्योगिक वसाहतीत जोरदार पाऊस झाला. घटस्थापना झाल्यानंतर दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.
हवामान खात्याने १० ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरीही दसऱ्यापर्यंत पावसाचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह पाऊस पडत असल्याने बाजारावर परिणाम झाला आहे. शहरातील गर्दी सायंकाळी कमी होत असल्याने ऐन पावसाचा परिणाम बाजारावर पाहायला मिळत आहे.