बॅन्ड, बॅन्जो वादकांवर आली उपासमारीची वेळ; व्यवसाय पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी इंदापूरच्या तहसीलदारांना दिले निवेदन
कोरोना काळात कलाकारांचे व व्यवसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले
बॅन्ड, बॅन्जो वादकांवर आली उपासमारीची वेळ; व्यवसाय पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी इंदापूरच्या तहसीलदारांना दिले निवेदन
कोरोना काळात कलाकारांचे व व्यवसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
कोविड-19 या संसर्गजन्य जागतिक महामारीच्या काळामध्ये मार्च महिन्यापासून बॅन्ड, बॅन्जो हा व्यवसाय पूर्णपणे बंद असल्याकारणाने या व्यवसायावर अवलंबून असणारे कलाकार व व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून याबाबत बॅन्ड, बॅन्जो चालक कलाकार संघटनेच्यावतीने व्यवसाय पूर्ववत करण्याच्या प्रमुख मागणीसाठी इंदापूरचे नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे सदरील मागण्यांच्या संदर्भातील लेखी निवेदन देण्यात आले.
दरम्यान बॅन्ड, बॅन्जो पूर्णपणे बंद असल्याने व्यवसायावर अवलंबून असणार्या कलाकारांची उपासमारी सुरू असून हाताला काम नसल्याकारणाने महामारीच्या काळामध्ये व्यावसायिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमधील सदरील व्यवसायाला काही प्रमाणात परवानगी मिळाली असून पुणे जिल्ह्यातील हा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे.मात्र आम्हाला 15 कलाकार व एका वाहनासह परवानगी मिळावी, कोरोना महामारी चा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग ठेवून आम्ही काम करू असे संघटनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून शासनाने योग्य अशी दखल घेऊन या घटकासाठी आर्थिक अनुदान देण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी देखील सदरील निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी बॅन्ड, बॅन्जो चालक कलाकार संघटनेचे अध्यक्ष करण ढोबळे, उपाध्यक्ष आकाश अडसूळ, कार्याध्यक्ष राजकुमार साबळे, सहसचिव मोतीराम पवार, अनिल जाधव, सहकार्याध्यक्ष गणेश सोनवणे, सदस्य दत्तात्रय ढोबळे, दादासाहेब खंडाळे उपस्थित होते.