भोंदू मनोहरमामाच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ
कोठडी संपल्यानंतर करमाळा पोलीस भोसलेला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेणार

भोंदू मनोहरमामाच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ
कोठडी संपल्यानंतर करमाळा पोलीस भोसलेला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेणार
बारामती वार्तापत्र
संत श्री. बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात दि. १० सप्टेंबरपासून पोलीस कोठडीत असलेल्या मनोहर भोसले (वय २९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्या पोलीस कोठडीत बारामती न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली.
दि.११ सप्टेंबर रोजी न्यायालयाने मनोहर भोसले याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. गुरुवारी दि. १६ रोजी ती संपल्याने तालुका पोलिसांकडून त्याला न्यायाधीश एन. व्ही. रणवीर यांच्यापुढे हजर करण्यात आले.
मागील वेळी प्रमाणे गुरुवारीही मनोहर भोसले याच्या भक्तांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती.
भोसले याच्या बाजूने अॅड. हेमंत नरुटे यांनी म्हणणे मांडले. सरकार पक्षाकडून अॅड. एन. पी. कुचेकर यांनी काम पाहिले. मनोहर भोसले याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत, त्यांना अटक करायची आहे, मनोहर भोसलेकडे गुन्ह्यातील रक्कम व अन्य बाबींचा तपास बाकी आहे, त्यामुळे पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी वकिलानी केली होती. न्यायालयाने ती मान्य करीत त्यात तीन दिवसांची वाढ केली. शुक्रवारी (दि. १०) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेत बारामतीत आणत अटक केली होती.
दरम्यान, भोसलेविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सध्या तो बारामती तालुका पोलिसांच्या कोठडीत आहे.
येथील कोठडी संपल्यानंतर करमाळा पोलीस भोसलेला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहेत. परंतु बारामतीतील फसवणूक प्रकरणात कोठडी वाढल्याने सध्या तरी करमाळा पोलिसाना प्रतीक्षा करावी लागणार आहे.