मदत वाटप करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास फोटातील सर्व व्यक्तींवर होणार कारवाई
अहमदनगर: लॉकडाउन काळात फूड पॅकेट, किराणा किटस्, सॅनिटायझर, मास्क आदींची मदत करताना त्याचे फोटो काढून प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर टाकल्यास आता चांगलेच महागात पडणार आहे. मदत वाटप करताना दोन पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास व मदत वाटप करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास फोटातील सर्व व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेशच काढले आहेत.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या हातावर पोट असलेले अनेक लोक सरकारच्या, स्वयंसेवी संस्थांच्या व दानशूरांच्या मदतीवरच तगून आहेत. त्यांच्यासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र, ही मदत देताना फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्वत:ची प्रसिद्धी केली जात आहे. त्यामुळे मदतकार्याच्या आडून स्वत:ची प्रसिद्धी करून घेणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश जारी केले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष, नेते, व्यक्ती हे त्यांच्यामार्फत फूड पॅकेटस, किराणा किटस, सॅनिटायझर, मास्क या स्वरुपाची मदत वाटत करीत आहेत. हे वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात असून हे लोक मदत वाटप करताना सर्रास गर्दी करतानाही दिसत आहेत. काही लोक तर चमकण्यासाठी मदत वाटप करतानाचे फोटो सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर प्रसारित करत आहेत. मदत वाटप करताना होणारी गर्दी व सोशल डिस्टन्स न पाळणे, यामुळे कोरोनाचा प्रसार होईल असे कृत्य होत आहे. त्यामुळे आता मदत वाटप करणाऱ्यांना काही नियमावली ठरवून देण्यात आली असून फोटो प्रसारित करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे, असं या आदेशात म्हटलं आहे