मराठा आरक्षणावर पवारांचे मोठे विधान; पार्थ यांच्या ट्वीटवर दिला ‘हा’ सल्ला
मराठा आरक्षणासाठी बीडमधील एका मराठा विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचे मत नोंदवले आहे. याबाबत पार्थ पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवरही पवारांनी प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षणावर पवारांचे मोठे विधान; पार्थ यांच्या ट्वीटवर दिला ‘हा’ सल्ला
पुणे:बारामती वार्तापत्र
मराठा आरक्षण मुद्द्यावर १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर अगदी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. पार्थ पवारच काय असे दहा जण सुप्रीम कोर्टात गेले तर त्याचा राज्य सरकारच्या प्रयत्नांना हातभारच लागेल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.
वाचा: पार्थ पवार म्हणाले, माझ्याकडं दुसरा पर्याय नाही! ट्वीटमुळं चर्चेला उधाण
‘मराठा आरक्षणावर कुणीही व्यक्ती कोर्टात जाऊ शकते. पार्थच काय, जर दहा लोक या प्रकरणात कोर्टात गेले तर त्याचा राज्य सरकारलाच फायदा होईल. शेवटी मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला जी स्थगिती देण्यात आली आहे ती उठवली जावी, हाच आमचाही उद्देश आहे आणि त्यासाठीच राज्य सरकारने विनंती अर्ज केला आहे’, असे पवार यांनी नमूद केले.
मराठा तरुणांना केली विनंती
आत्महत्येच्या घटनेवर पवार यांनी चिंता व्यक्त केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न आत्महत्येने सुटणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. विशेषत: तरुणांनी यात संयम दाखवायला हवा, अशी विनंती शरद पवार यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अगदी शंभर टक्के राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याशीही याबाबत माझे बोलणे सुरू आहे. सरकारचे म्हणणे कोर्टापुढे मांडावे आणि मराठा समाजात जी अस्वस्थता पाहायला मिळत आहे ती दूर व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे, असेही पवार यांनी पुढे नमूद केले.