महादेव मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य धोक्यात
दोन वेळा रस्ता कॉंक्रिटीकरण होऊनही खड्डे कसे काय पडतात नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

महादेव मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य धोक्यात
दोन वेळा रस्ता कॉंक्रिटीकरण होऊनही खड्डे कसे काय पडतात नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
निलेश भोंग प्रतिनिधी
निमगाव केतकी येथील मारुती महादेव मंदिर ते निमगांव केतकी पोलीस चौकी या रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रस्त्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याला मोठ मोठाले खड्डे पडत आहेत. घरांमधून निघणारे मोरीचे सांडपाणी सरळ रस्त्यावर सोडून दिले जात असल्याने हे पाणी मारुती महादेव मंदिराच्या पायरी नजीक जात असून यामुळे या मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
या रस्त्याला अंडरग्राउंड गटारीची सुविधा असताना देखील आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून हे पाणी रस्त्यावर सोडून दिल्यामुळे या रस्त्याला सध्या गटारीचे स्वरूप आले आहे. वारंवार मागणी करून देखील या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष का देत नाही हा एक कुतूहलाचा विषय आहे. मात्र या रस्त्या लगत असणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्त्यावरील खड्ड्यात साचणाऱ्या पाण्याचा त्रास होत असून येणाऱ्या जाणाऱ्या मोटारी मुळे हे पाणी थेट दुकानात पोचले जाते. या रस्त्याचे काँक्रिटीकरण दोन वेळा होऊनही रस्त्याला खड्डे कसे काय पडतात हा सर्वसामान्य जनतेला पडलेला एक प्रश्न आहे.
येणाऱ्या काळात या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास या सांडपाण्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा तेथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.