महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता!
'या' 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता!
‘या’ 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
प्रतिनिधी
मुंबईसह महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र भारतीय किनारपट्टी पासून दूर गेलं आहे. पण आता अंदमानच्या समुद्रात नवीन संकट उभं ठाकलं आहे. या ठिकाणी देखील हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
आज दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांसाठी राज्यात विविध ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आले आहेत. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर आणि नांदेड या अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे.
आज सकाळपासूनचं दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय गोवा, कर्नाटक, केरळ, आणि आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांवर देखील तीव्र पावसाचे ढग दाटले आहेत. गेल्या आठवड्यापासून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं पुरस्थिती निर्माण झाली आहे. येथील अस्मानी संकट कायम असून पुढील चोवीस तासांत याठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.