कोरोंना विशेष

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण व न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील कृतिदल सक्रिय

राज्य शासनाने कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती दल स्थापन करण्याचे निर्देश दिले

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचे संरक्षण व न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील कृतिदल सक्रिय

राज्य शासनाने कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती दल स्थापन करण्याचे निर्देश दिले

मुंबई, बारामती वार्तापत्र रिपोर्ट

कोरोनामुळे दोन्ही किंवा एका पालकांचा मृत्यू झाल्यास त्या बालकांचे संरक्षण करणे आणि त्यांना न्याय्य हक्क  मिळावेत आणि त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी जिल्हा कृतिदल स्थापन करुन त्याअंतर्गत अशा बालकांचे सर्वेक्षण करून सोयी  सुविधा पुरविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांनी आखणी केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३११८ व्यक्ती मृत झाल्या असून, त्यांच्या कुटुंबियांचे सर्वेक्षण करुन माहिती घेण्याचे काम सुरु झाले आहे.

राज्य शासनाने कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती दल स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी गठित या कृती दलाची दुसरी बैठक नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विक्रमसिह भंडारी,सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शंकर जाधव अध्यक्ष, बालकल्याण समिती, श्रीमती अनुराधा शिंदे अध्यक्ष, बालकल्याण समिती मुंबई उपनगर, पोलीस निरीक्षक राणे व श्री कुपेकर, डॉ.पवार बृहन्मुंबई महानगर पालिका प्रतिनिधी, युवा चाईल्ड लाईन संस्थेचे प्रतिनिधी, अब्दुल चौधरी (समन्वय अधिकारी) जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती शोभा शेलार उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात सद्यस्थितीत एक पालक गमावलेल्या ४४४ तसेच दोन्ही पालक गमवलेल्या ७ घटना समोर आल्या आहेत. जिल्हा महिला व बाल विकास विभागातील आकडेवारी नुसार जिल्ह्यात आता पर्यंत ७ बालकांचे दोन्ही पालक कोविड १९ या काळात मृत्यू पावल्याबाबत माहिती समोर आलेली आहे.मात्र आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यामागे आणखी बालकांचा समावेश आहे का याची माहिती घेण्यात यावी. स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जावे. तसेच पालक गमावलेल्या बालकांना आवश्यक त्या सोई-सुविधा पुरवण्यात याव्यात असे निर्देश श्री. बोरिकर यांनी यावेळी दिले.

वस्तीपातळीवर चौकशी  करत असताना आंगणवाडी सेविकांना काही अडचणी आल्यास तात्काळ मदत उपलब्ध करून देण्याबाबत सर्व स्थानिक पोलीस स्थानकांमध्ये कळविण्यात आले आहे. अशा बालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस स्थनकातील मोबाईल व्हँनच्या माध्यमातूनही स्थानिक पातळीवर जनजागृती करावी अशा सूचना देण्यात आल्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील उपस्थित प्रतिनिधी यांना त्यांच्या स्तरावरून सर्व प्रभाग निहाय अधिकारी (वार्ड ऑफिसर) यांना ही माहिती संकलन करून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच सर्व बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थामधील कर्मचारी यांचे प्राधान्याने लसीकरण करून घेण्यात यावे असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

बालकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक सेवा पुरवणे, मदत करणे त्यांचे समुपदेशन व पुनर्वसन करण्यात येणार आहे. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यामागे आणखी बालकांचा समावेश आहे का याची माहिती घेण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

या वेळी बाल संरक्षण समितीसाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!