माऊलीच्या पादुका नेहण्याचा मान बारामती च्या तुषार काशीद यांना.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2020/07/af9976e4-6153-4790-a5f4-e5316d8ffbfc.jpg)
माऊलीच्या पादुका नेहण्याचा मान बारामती च्या तुषार काशीद यांना.
एसटी बस मधून माऊलीच्या पादुकांचे पंढरपूर कडे प्रस्थान.
बारामती:वार्तापत्र बारामती च्या तुषार काशीद यांना माऊली च्या पादुका असणारी बस चालविण्याचा मान मिळाला आहे.
माझ्या घरातच वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.
माझे चुलते-चुलती आषाढी वारी करत असतात. यंदा “लाल परी’ला मान मिळाला. खूप कौतुकास्पद गोष्ट वाटते.
कमी वयात मला माऊलींच्या सेवेची संधी मिळाली.
खूप नशीबवान ठरलो. माझ्या आयुष्याचे सार्थक झाले.
”, अशा शब्दांत वल्लभनगर येथील एसटीचालक तुषार काशीद यांनी भावना व्यक्त केल्या.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने यंदा आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पायी नेण्याऐवजी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या बसगाड्यांमधून श्री क्षेत्र पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार, माऊलींचा पादुका एसटीमधून नेण्याचा बहुमान वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) एसटी आगाराचे एसटी चालक तुषार काशीद यांना मिळाला. या सोहळ्याच्या प्रवासाचा अनुभव सांगताना काशीद यांनी वरील भावना बोलून दाखविल्या.
काशीद म्हणाले, “श्री क्षेत्र आळंदी येथून दुपारी 2 वाजता “विठाई’ बसमधून माऊलींचा सोहळा मार्गस्थ झाला. माऊलींच्या पारंपारिक पालखी मार्गानेच म्हणजे सासवड, जेजुरी, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस मार्गे वेळापूर बसचा प्रवास झाला. वाखरी येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सोहळा पोचला. वाटेत काही ठिकाणी वारकरी, भाविकांनी पालख्यांवर फुलांची उधळण केली.
बसगाडीच्या मागे-पुढे बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गाडी कुठे उभी करायची नाही, अशाच आम्हाला सूचना होत्या. काशीद यांचे बारामती तालुक्यातील शिसरने हे मूळगाव.
मागील 5 वर्षांपासून ते एसटी महामंडळात बसचालक म्हणून कार्यरत आहेत.
श्री क्षेत्र आळंदी देवस्थाननेच “विठाई’ एसटी बसवर फुलांची आकर्षक सजावट केली होती. बसच्या आतून आणि बाहेरून फुलांच्या विविध रंगी माळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
याची थोडी खंत वाटते लाखो वारकरी दरवर्षी आषाढीला माऊलींच्या पालखी सोहळ्यासमवेत पायी जात असतात.
यंदा त्यांची वारी हुकली. कोरोनाच्या प्रकोपामुळे वारकऱ्यांना माऊलींचे नीट दर्शनही घेता आले नाही.
याची थोडी खंत वाटते,”, असेही तुषार काशीद यांनी सांगितले.