माजी सैनिक व विधवा पत्नींना मालमत्ता करात मिळणार सूट
राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय.
बारामती वार्तापत्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबरला शासन निर्णय पारित करून माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना बाळासाहेब ठाकरे मालमत्ता कर माफी योजनेची घोषणा केली.
माजी सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे देशाचे संरक्षण केले आहे. त्यांनी केलेले देशाची सेवा व विविध स्तरावरुन प्राप्त झालेली मागणी विचारात घेता सर्व माजी सैनिकांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्याच्या दृष्टीकोनातून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देणे आवश्यक असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मालमत्ता कराबाबत महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949, मुंबई महापालिका अधिनियम 1988 व महाराष्ट्र अधिनियम 1988 व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानूसार माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला बाळासाहेब ठाकरे मालमत्ता कर माफी योजना या योजनेंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेत असल्याचे शासनाने म्हटले आहे. अशा कर माफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.