माळेगाव बु

‘माळेगाव’ची निवडणूक गाजणार;पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या, उद्या भूमिका स्पष्ट करणार?

निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल

‘माळेगाव’ची निवडणूक गाजणार;पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या, उद्या भूमिका स्पष्ट करणार?

निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने माळेगाव कारखान्याची निवडणूक राज्यात गाजणार आहे.

विरोधी गटाचे नेते चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांनी देखील ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे घोषित केले आहे, त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार हे माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. ३०) पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याने माळेगावची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २२ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २७ मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. या निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सह, कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजनकुमार तावरे यांच्यासह यांच्या समर्थक उमेदवारांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघतून दाखल झाल्याने ही निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेत आली आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ही निवडणूक आपण पूर्ण ताकतीने लढवणार असल्याचे जाहीर करत आपण स्वतः या निवडणुकीत उतरणार असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा उमेदवार १२ जून रोजी प्रचाराच्या शुभारंभावेळी घोषित करणार असल्याचे त्यांनी या सभेत म्हटले होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या या वक्तव्यामुळे संभाव्य अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? याबाबत विविध तर्कवितर्क काढण्यात येत आहेत.

अजित पवारांच्या खेळीमागे राजकीय गणिते?

सध्या कारखान्याचे अध्यक्षपद ॲड केशवराव जगताप यांच्याकडे आहे. अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी पणदरे गटातील ॲड केशवराव जगताप यांची अध्यक्षपदी निवड करून उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्वांना धक्का दिला होता. मात्र या निवडणुकीत अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून ते कोणाच्या नावाची घोषणा करतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वतःची उमेदवारी दाखल करून उपमुख्यमंत्री पवार अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्याच नावाची घोषणा करतात की काय? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्या या खेळीमागे मोठी राजकीय गणिते असल्याचे बोलले जात आहे.

तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता

दरम्यान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीपासून अलिप्त राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मात्र उतरणार असल्याचे दिसत असून या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी उद्या ३० मे रोजी (शुक्रवारी) सायंकाळी ४ वाजता बारामतीतील कृष्णसागर हॉटेल येथे सर्वपक्षीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

इच्छुक उमेदवार उमेदवारांची चाचपणी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष ॲड एस. एन. जगताप, सतीश खोमणे, ॲड राजेंद्र काटे, गणपतराव देवकाते यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button