माळेगावची निवडणूक होणार नाहीच
बारामती तालुक्यात सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माळेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील सर्वच उमेदवारांनी माघार घेतली आहे
माळेगावची निवडणूक होणार नाहीच
बारामती तालुक्यात सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माळेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील सर्वच उमेदवारांनी माघार घेतली आहे
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या माळेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील सर्वच उमेदवारांनी माघार घेतली आहे. भविष्यात माळेगाव नगरपंचायत होणार असल्याने तब्बल 77 जणांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.
माळेगाव ग्रामपंचायत नगरपंचायत होणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, गावातील प्रमुखांनी एकत्र येत निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्ष उमेदवारांची समजूत काढताना गावपुढाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.
माळेगाव ही बारामती तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गोविंद बाग हे निवासस्थान, माळेगाव साखर कारखाना आणि शिवनगर विद्या प्रसारक मंडळ याच ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. त्यामुळे या माळेगाव ग्रामपंचायतीला विशेष महत्त्व आहे.
येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये माळेगाव ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. मात्र या ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रलंबित असल्यानं येथील सर्वच गटांच्या प्रमुखांनी एकत्र येत निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. याचा परिणाम म्हणजे आज सर्वच्या सर्व म्हणजेच 77 उमेदवारांनी माघार घेतलीय. त्यामुळे माळेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाही यावर आता शिक्कामोर्तब झालंय.
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (23 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. आज या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक पक्षांनी आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी केली. त्यात काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी यश आलं नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात निवडणुका अटळ झाल्या आहेत.