“माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नावीन्यपूर्ण ऑनलाइन माजी विद्यार्थी मेळावा अभूतपूर्व उत्साहात संपन्न “
तब्बल 600 विद्यार्थ्यांचा विविध देशांमधून मेळाव्यासाठी सहभाग
“माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नावीन्यपूर्ण ऑनलाइन माजी विद्यार्थी मेळावा अभूतपूर्व उत्साहात संपन्न “
तब्बल 600 विद्यार्थ्यांचा विविध देशांमधून मेळाव्यासाठी सहभाग.
बारामती:–माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1994 ते 2019 या कालावधीमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व माजी अभियंता विद्यार्थ्यांचा मेळावा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
लॉकडाऊनमुळे ऑनलाइन माध्यमांद्वारे अभूतपूर्व उत्साहात पार पडला.
या नाविन्यपूर्ण मेळाव्यासाठी ऑनलाईन झूम अपद्वारे सुमारे 600 माजी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.शाळा कॉलेजचे दिवस संपले की प्रत्येक जण आप-आपल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो.
मात्र ज्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो तसेच ज्या कॉलेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपले मैत्रीचे नाते जोडले जाते ती नाळ मात्र तशीच असते.तसेच विद्यार्थी व शिक्षकांमधील आदरपूर्वक मैत्री व शिक्षकांकडून मिळालेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आयुष्यभर पावलोपावली येणाऱ्या अडचणींना व आव्हानांना सोडविण्यासाठी प्रेरणादायी ठरते.सर्व जुन्या मित्रांना शिक्षकांना भेटावे त्यांच्याशी हितगुज करावे असे सर्वांना वाटते.
मात्र मोठा कालखंड लोटला तरी प्रत्येकजण आपापल्या नोकरीधंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही मात्र ते अशक्य नसते हे माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाने ऑनलाइन माजी विद्यार्थी मेळाव्याद्वारे दाखवुन दिले आहे.या मेळाव्याद्वारे तब्बल मागील पंचवीस वर्षातील सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्यात महाविद्यालयाला यश आले.
मेळावा ऑनलाइन असल्यामुळे विविध देशातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभागी होणे शक्य झाले. यामध्ये अमेरिका , इंग्लंड , जपान ,जर्मनी , दुबई ,ऑस्ट्रेलिया,सौदी अरेबिया ,साऊथ आफ्रिका इत्यादी.
देशातील माजी विद्यार्थ्यांचा समावेश घेता आला असल्याची माहिती या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी पुढाकार घेतलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम. मुकणे यांनी दिली .
कार्यक्रम विविध चर्चासत्राने रंगला.विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत केलेल्या चर्चा व हास्य कल्लोळामुळे या मेळाव्यात रंगत भरली.माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा आणि आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये करिअर विषयक विचारांची देवान-घेवाण व्हावी तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या संधी व मार्गदर्शन असा उद्देश या मेळाव्याच्या असल्याचे संस्थेचे सचिव प्रमोद शिंदे यांनी आपल्या
उद् घाटणपर संदेशात म्हटले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी साधला व त्यांना संस्थेची उत्तरोत्तर होणारी प्रगती बद्दल आढावा दिला व आपल्या कॉलेजमधील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी कॉलेजचे नाव उज्ज्वल केले आहे अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्व माजी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.मुकणे सरांनी महाविद्यालयातील चालू असणाऱ्या सर्व घडामोडींवर आधारित प्रेझेंटेशन सादर केले यामध्ये विद्यार्थ्यांची चालू असणाऱ्या शैक्षणिक घडामोडींबद्दल ,महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या संशोधन उपक्रमांबद्दल , शिक्षक व विद्यार्थ्याद्वारे नोंदवण्यात आलेल्या रिसर्च पेंटंटबद्दल , कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल , तसेच मागील चार वर्षातील उत्कृष्ट निकाल इत्यादी गोष्टींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सादर केली.
तसेच या मेळाव्यामध्ये अॅल्युमिनी असोसिएशनची स्थापना करण्याचे ठरले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली.
त्यानंतर या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे संयोजक व महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. माधव राउळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यामध्ये त्यांनी ट्रेनिंग प्लेसमेंटद्वारे घेण्यात येणाऱया विविध कार्यक्रमाचा आढावा सादर केला व विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती , नामांकित कंपन्यातील तज्ञांकडून विद्यार्थ्यांसाठी वेळोवळी घेण्यात येणाऱी व्याख्याने व प्रशिक्षणे बाबत , तसेच लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती सादर केली.
तसेच या वर्षी आतापर्यंत जवळपास 200 विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत व ही प्रक्रिया अजूनही चालू आहे असेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा दिला व महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रमाद्वारे यामध्ये इंटर्नशिप , लॅब स्पॉन्सरशिप ,प्लेसमेंट व ऑन जॉब ट्रेनिंग , स्पॉन्सर्ड प्रोजेक्ट ,सेंटर ऑफ एक्सलन्स ,तज्ज्ञांची व्याख्याने , संशोधन अॅक्टिव्हिटी , गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत ,महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थ्यांसाठी मेंटॉरशिप देण्याबाबत माजी विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवण्यासाठी प्रोत्साहित केले.
महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी त्यासाठी योगदान देऊन सहकार्य करावे अशी भावना यावेळी सर्व विभाग विभाग प्रमुखांनी दर्शवली. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक वर्षातील काही विद्यार्थ्यां प्रतिनिधींनी आजी-माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यामध्ये भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे भगवान बाथे ,दिल्ली युनिवर्सिटीमध्ये डीन म्हणून कार्यरत असणारे डॉ. विशाल तलवार ,अमेरिका येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असणारे अभिमन्यू वाबळे , लंडनमध्ये टीम लीडर पदी कार्यरत असणारे कृष्णकांत अग्रवाल ,दिल्ली येथील मेपल ग्रुप मध्ये डायरेक्टरपदी कार्यरत असणारे अमित कुलकर्णी ,मुंबईमध्ये मार्केटिंग कन्सल्टींग मध्ये कार्यरत असणारे निरज गुलाठी , पुणे येथे आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये मॅनेजरपदी कार्यरत असणाऱ्या आदिती कुलकर्णी , दुबई येथे स्वतःचा उद्योग असणारे राहुल घोरपडे , मुंबई येथील कंपनीमध्ये मेंटेनन्स हेड म्हणून कार्यरत असणारी कल्याणी चव्हाण , पुणे येथे स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी असणारे विक्रम गायकवाड ,साऊथ आफ्रिका येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असणारे शहाबाज पठाण , राज्य शासनामध्ये अभियंता म्हणून कार्यरत असणारे अमोल मसकर ,बेंगळूर येथे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कार्यरत असणारे सिद्धार्थ शिंदे इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता.सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये व विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा व तयारी दर्शवली.तसेच महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे त्याचबरोबर सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी व स्वतःचा स्टार्टअप बिझनेस सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयातील महाराष्ट्र शासनामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले व भविष्यात काहीही मदत व माहिती मिळवण्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन केले.या मेळाव्यासाठी मागील पंचवीस वर्षातील माजी विद्यार्थी ,सध्या शिकत असणारे विद्यार्थी आणि आजी-माजी शिक्षकांनी मेळाव्यास आपुलकीने उपस्थिती दर्शवत महाविद्यालयावरील आपले प्रेम व्यक्त केले.या निमित्ताने जुन्या मित्रांची भेटही घडून आली.” रुरल टू ग्लोबल “या संकल्पने अंतर्गत भविष्यात गुरुदक्षिणा म्हणून संस्थेस पुढील काळात लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन माजी विद्यार्थ्यांनी यावेळी आप-आपल्या मनोगतात बोलताना दिले.
आगामी काळात महाविद्यालयांमध्ये माजी विद्यार्थी मेळावा घेण्याची इच्छा सर्व विद्यार्थ्यांनी दर्शवली.भविष्यात होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये जास्तीजास्त माजी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन डॉ. माधव राउळ यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक हेमंत सुपेकर यांनी केले. महाविद्यालयाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष
श्री.बाळासाहेब तावरे व सचिव श्री. प्रमोद शिंदे यांनी प्राचार्य व त्यांच्या शिक्षक कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले.