मास्क न वापरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार.
कोरोना बाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
मास्क न वापरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा
उपमुख्यमंत्री अजित पवार.
कोरोना बाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बारामती वार्तापत्र
• आमदार स्थानिक विकास निधीतून कोरोनासाठी 10 लाख रुपयांचे पल्स ऑक्सिमिटर व थर्मल स्कॅनर आशा वर्करकडे सुपूर्द.
• बारामती शहर पोलीस व ग्रामीण पोलीस यांना स्मार्ट पोलीसिंग प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल सत्कार
• कोविड -19 फंडातून खरेदी केलेल्या ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन
बारामती, दि. 29.:- बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाटयाने वाढत असल्याने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
कोरोना बाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, मुख्य अभियंता (महावितरण) सुनील पावडे, अधीक्षक अभियंता (जलसंपदा विभाग, पुणे) संजीव चोपडे, उपवन संरक्षक पुणे विभाग राहुल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना विषाणूचा संसर्ग बारामती शहरासह तालुक्यात झपाट्याने वाढत आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दक्ष राहून कोरोना प्रतिबंधित उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णालयात रुग्णांना देण्यात येत असलेले जेवण हे चांगल्या प्रतीचे असावे. गंभीर रुग्णांना तात्काळ हॉस्पिटल मध्ये ॲडमिट करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती तालुक्यातील कोरोना बाबतची सद्य:स्थिती व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार स्थानिक विकास निधीतून बारामती तालुक्यातील आशा वर्कर यांच्यासाठी 10 लाख रुपयांचे पल्स ऑक्सिमिटर व थर्मल स्कॅनर तसेच मुंबईतील उद्योजक आशिस पोतदार यांच्याकडून दुसऱ्यांदा प्राप्त झालेल्या अर्सेनिक गोळया बारामतीतील 1 लाख कुटुंबासाठी प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.
पुणे विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट पोलीसींग उपक्रमांतर्गत बारामती तालुका पोलीस स्टेशन आणि बारामती शहर पोलीस स्टेशन यांना स्मार्ट पोलीसींग आयएसओ 9001-2015 प्रमाणपत्र मिळाल्याने ग्रामीण पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप आणि बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि उपविभागीय पोलीस अधिाकरी नारायण शिरगावकर उपस्थित होते.
तसेच कोविड -19 फंडातून खरेदी केलेल्या ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ही ॲम्ब्युलन्स रूई ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली.