माहिती पटाच्या माध्यमातून वनवणवा नियंत्रण व जैवविविधतेबाबत जनजागृती
शाळकरी विद्यार्थीदेखील उत्सुकतेने या विषयांची माहिती घेताना दिसत आहेत.
माहिती पटाच्या माध्यमातून वनवणवा नियंत्रण व जैवविविधतेबाबत जनजागृती
शाळकरी विद्यार्थीदेखील उत्सुकतेने या विषयांची माहिती घेताना दिसत आहेत.
पुणे, प्रतिनिधी
जिल्हा माहिती कार्यालय पुणे मार्फत जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून ‘वनवणवा नियंत्रण व जैवविविधता’ या संकल्पनेवर पाच माहितीपट तयार करण्यात आले आहेत. माहितीपटाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दौंड, इंदापुर, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात नागरिकांना माहितीपटाद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात येत आहे.
चित्ररथ आणि एलईडी वाहन जिल्ह्यातील वनक्षेत्र अधिक असलेल्या भागातील प्रत्येकी ३०० पेक्षा अधिक गावातून फिरणार आहे. संकल्पनेशी संबंधित ५ विविध विषयांवर लघुचित्रफीती तयार करण्यात आल्या आहे. त्यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, मकरंद अनासपुरे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ.महेश गायकवाड यांच्या संदेशाचादेखील समावेश करण्यात आला आहे.
आपली झाडे-एक वनसंपदा, जैवविविधता-अलंकार महाराष्ट्राचा, जैवविविधता पूरक गाव, वनवणवा नियंत्रण, मानव आणि वन्यजीव संघर्ष अशा चित्रफीतींच्या माध्यमातून वनक्षेत्रालगतच्या गावात ‘वनवणवा’ बाबत काय दक्षता घ्यावी, वनसंपदेचे महत्व सांगण्यासोबतच गावातील प्रत्येक नागरिकाने काय काळजी घेतली पाहीजे याबाबत माहिती देण्यात येत आहे. शाळकरी विद्यार्थीदेखील उत्सुकतेने या विषयांची माहिती घेताना दिसत आहेत.
जैवविविधता कशी जपता येईल, यामध्ये आपले योगदान काय असावे, जैवविविधता कशी कमी झाली? जैव विविधतेची समृद्धी कशी टिकावता येईल याबाबतचा संदेश माहितीपटाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, बोरीपार्धी, केडगाव, रावणगाव, पुरंदर तालुक्यातील माळशिरस भुलेश्वर, खेड तालुक्यातील आंबोली,वाडा, आव्हाट, इंदापुर तालुक्यातील लाकडी, निंबोडी, शेटफळगडे, भिगवण गावात ग्रामस्थांनी चित्ररथाला चांगला प्रतिसाद दिला.