मुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू.
पोलीस उपायुक्तांनी त्याबाबतचे आदेशच आज जारी केले आहेत.
मुंबईत नवीन लॉकडाऊन नाही; पण आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू.
पोलीस उपायुक्तांनी त्याबाबतचे आदेशच आज जारी केले आहेत.
मुंबई: बारामती वार्तापत्र रिपोर्ट
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणावर सापडू लागल्याने मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून या काळात ४ पेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. ही जमावबंदी असून नवीन लॉकडाऊन नाही, असं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
पोलीस उपायुक्तांनी आज संध्याकाळी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. मुंबईत करोनाचा कहर पुन्हा वाढल्याने अधिक लोकांनी गर्दी करू नये म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. चार पेक्षा अधिक नागरिकांनी बाहेर फिरू नये यासाठी आज मध्यरात्रीपासून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे. राज्य सरकारने ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच जमाववबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अनलॉकमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मिशन बिगीन अंतर्गत ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आलेली आहे, त्या गोष्टी जमावबंदी लागू केल्यानंतरही सुरूच राहणार आहे. जमावबंदी लागू करण्याचा आदेश हा नियमित आदेश असून दर १५ दिवसांनी असे आदेश पोलिसांकडून काढले जातात. त्यामुळे जमावबंदी म्हणजे नवीन लॉकडाऊन असल्याचा कुणीही गैरसमज करून घेऊ नये, असंही या आदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, या जमावबंदीतून अत्यावश्यक सेवा आणि त्यातील कर्मचारी, शासकीय-निमशासकीय संस्था आणि त्यांच्याशी संबंधीत संस्था, अन्नपदार्थ विक्रेते, भाजीपाला विक्रेते, दूध , रेशन आणि किराणा सामान, रुग्णालये, मेडिकल, पॅथोलॉजी, नर्सिंग कॉलेज, टेलिफोन, इंटरनेट सेवा, इलेक्ट्रिक्स, पेट्रोलियम पदार्थ, बँक, शेअर बाजारातील कर्मचारी, आयटी, प्रसारमाध्यमे, बंदरे, होम डिलिव्हरी, मालवाहतूक आदी सेवांना या संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे.