मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना बारामती; फक्त 94 मते
अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता

मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना बारामती; फक्त 94 मते
अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल समोर आले . निकालाचा कल हा महायुतीच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळाला. आजच्या निकालात विजयी आणि पराभूत झालेल्यांची नावे पाहून बऱ्यापैकी सर्वच पक्षांतील उमेदवारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या विधानसभेची 288 जागांसाठी ही निवडणूक होती तर 217 ठिकाणी महायुती सरकारनं विजय मिळवला आहे, यामुळेच महाविकास आघाडीला मोठा झटका बसला. असाच एक झटका बसला आहे अभिजित बिचुकले यांना
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी यंदा दोन मतदारसंघांमधून विधानसभा निवडणूक लढवली. नेहमीप्रमाणे यंदाही त्यांना पराभवाचा जोरदार धक्का बसताना दिसत आहे. बारामती, साताऱ्यातून त्यांनी निवडणूक लढवली होती. दोन्ही मतदारसंघांत ते मोठ्या फरकानं पिछाडीवर आहेत. त्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त होण्याची शक्यता आहे.
अभिजित बिचुकले यांना फक्त 94 मते
अभिजित बिचुकले यांना फक्त 94 मते मिळाल्याचे समोर आले. अभिजित बिचुकले यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक साताऱ्यातून अपक्ष म्हणून लढवली होती, मात्र त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. तेव्हाही त्यांना केवळ 1395 मते मिळाली होती. तेव्हा साताऱ्यातून भाजपचे उदयनराजे भोसले विजयी झाले होते.
बिग बॉस नंतर तर अभिजीत बिचुकले हे जास्तच चर्चेत यायला लागले. बारामती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली होती. सलग ७ वेळा या मतदारसंघातून आमदार राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे त्यांना आव्हान होते. पण निकालात दिसल्याप्रमाणे अजित पवारांनी विजय मिळावला आहे. अभिजित बिचुकले यांना फक्त 94 मते मिळाली. बारामती जागेसाठी नोटासह एकूण 24 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अभिजीत 20 व्या स्थानावर आहे
दरम्यान गेल्यावेळी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातूनही आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता अभिजित बिचुकले यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच अभिजीत बिचुकले यांनी वारंवार मुख्यमंत्री तर कधी राष्ट्रपती बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण आधी आमदारा बनण्याच्या स्पर्धेत ते कधी जिंकणार असा प्रश्न आहे.