मुलांनो,आत्महत्येचा मार्ग निवडू नका…. लक्ष्मण जगताप
पालकांच्या वाढत्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांवर लादली जाणारी स्वप्ने याखाली विद्यार्थी दबून जातात

मुलांनो,आत्महत्येचा मार्ग निवडू नका…. लक्ष्मण जगताप
पालकांच्या वाढत्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांवर लादली जाणारी स्वप्ने याखाली विद्यार्थी दबून जातात
बारामती वार्तापत्र
माणसाच्या मन,मनगट आणि मेंदूचा विकास करते शिक्षण. माणूसाला चांगले काय वाईट काय ओळखायला शिकवते ते शिक्षण.माणसाला सुसंस्कृत बनविते ते शिक्षण. अशा शिक्षणाच्या अनेक व्याख्या तज्ञांनी केल्या आहेत.शिक्षणातून आत्मसात केलेले ज्ञान आणि कौशल्ये पडताळून पाहण्याची व्यवस्था म्हणजे परीक्षा होय.परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संपादणूक पाहता येते.आजही आपण परीक्षेला दुसरा पर्याय शोधू शकलो नाही.ही मोठी खंत आहे.
असे प्रतिपादन प्रेरक शिक्षक लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.विद्या कॉर्नर कट्टा येथे आयोजित चर्चा सत्रात ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत होते या वेळी विविध शाळा मधील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
दहावी,बारावी ,जेईई ,नीट,सीईटी,स्पर्धा परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांच्या होणा-या आत्महत्या हा खूप चिंतेचा विषय बनला आहे.तुम्ही जर वर्षभर नियोजनबद्ध अभ्यास केला असेल ,तुमचे अभ्यासात सातत्य असेल ,तुमचा सराव चांगला झाला असेल तर परीक्षेचा ताण घेण्याची गरज नाही. शिक्षणातील वाढती स्पर्धा ताण घेणा-या विद्यार्थ्यांचे सुंदर आयुष्य उध्वस्त करते.
पालकांच्या वाढत्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांवर लादली जाणारी स्वप्ने याखाली विद्यार्थी दबून जातात.स्पर्धेला तोंड देता देता विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक होते.आवडत्या विद्या शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धेला सामोरे जावे लागते.यातून अपयश आले की मुलांना सहन होत नाही.आपली मानहानी होईल या भीतीने मुले आत्महत्येसारखे पाऊल उचलतात.
खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. प्रत्येकाची बौध्दिक क्षमता वेगवेगळी असते.कौशल्येही वेगवेगळी असतात. आपण मुलांची विनाकारक तुलना करतो आणि त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होईल अशी शाब्दिक शेरेबाजी करतो यामुळे मुले प्रचंड दु:खी होतात.आपल्याला दोषी ठरविले जाते.कोणीच समजून घेत नाही.अशी अपराधीपणाची भावना मनात बळावते.यातून अशा आत्महत्या घडतात.
पालक म्हणून आई वडिलांची खूप मोठी जबाबदारी आहे.आधी आपला पाल्य महत्वाचा आहे.मुले हीच आपली खरी संपत्ती आहे.त्यांना गमावून तुम्ही जीवनात काय साध्य करणार आहात.आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी मुले नाहीत.
मुलांना त्यांच्या आवडीने कलाने शिकू द्या. त्यांची बलस्थाने शोधून त्यांना प्रेरीत करा.त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.त्यांच्यावर तुमच्या इच्छा आकांक्षा अजिबात लादू नका.चुकेल त्यावेळी मुलांना समजून घ्या. त्यांना मानसिक आधार द्या. माझे आईबाप माझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत या विचाराने मुलांचा आत्मविश्वास वाढतो.
परीक्षेच्या पलीकडेही एक सुंदर आयुष्य आहे मुलांना दाखवून द्या. परीक्षेत अपयशी पण आयुष्याच्या परीक्षेत उत्तम कामगिरी केलेली अनेक यशस्वी माणसे आहेत.त्यांचा जीवनप्रवास उलगडून सांगा.शक्य असेल भेटवा.त्यांच्याशी संवाद साधा.परीक्षेतील मार्क म्हणजेच सगळं काही असेही नाही.काही माणसे शाळेची पायरी चढली नाहीत परंतु आपली अंगभूत कौशल्ये आणि व्यवहारज्ञानाच्या जोरावर यशस्वी लोकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान आहे.
ज्यांच्या हाती परीक्षेत शून्य होता त्यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपले आयुष्य घडविले आहे .अशा माणसांची माहिती द्या.मुलांचे मनोबल वाढवा म्हणजे आयुष्यात येणा-या खाचखळग्यांना सामोरे जाण्याची ताकद त्यांना नक्की मिळेल.आपल्या मुलांना गमवायचे नसेल तर त्याला स्वतंत्रपणे उमलू द्या. फुलू द्या. असेही लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.