मोठी बातमी! आचारसंहितेचा पहिला दणका, बारामतीत तिघांविरोधात गुन्हा
राजकीय पक्षाच्या लाभ होईल, असे वक्तव्य

मोठी बातमी! आचारसंहितेचा पहिला दणका, बारामतीत तिघांविरोधात गुन्हा
राजकीय पक्षाच्या लाभ होईल, असे वक्तव्य
बारामती वार्तापत्र
आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरुन बारामती शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विस्तार अधिकारी तेजस राजेंद्र जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे.
बारामती सहकारी बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राजकीय पक्षाच्या लाभ होईल, असे वक्तव्य करीत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
पोपट ढवाण पाटील, सुरेश देवकाते व सूर्यकांत (सुरेंद्र) गादीया (रा. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बारामतीत विधानसभा निवडणूकीसाठी स्थापन झालेल्या भरारी पथकाचे प्रमुख व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तेजस राजेंद्र जगताप (रा. बावडा, ता. इंदापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली. निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडून जगताप यांची भरारी पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
(दि.२७) आॅक्टोबर रोजी येथील राजमाता जिजाऊ सभागृहात बारामती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधाऱण सभा पार पडली. सभेमध्ये या तिघांनी राष्ट्रवादीचे त्यावेळी संभाव्य असणारे उमेदवार अजित पवार यांना मदत करा, असे राजकीय वक्तव्य करत आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार सागर अरुण सस्ते यांनी बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे केली होती. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी यासंबंधी चौकशी करण्यासाठी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) प्रमोद दुरगुडे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी चौकशी करत या प्रकरणी आपला अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱयांना सादर केला.
तदनंतर फिर्याद देण्यासाठी जगताप यांना निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडून प्राधिकृत करण्यात आले. राजकीय सभा नसताना तेथे राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाला किंवा उमेदवाराला लाभ होईल, असे वक्तव्य करत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.