मोठी बातमी: कुख्यात गुंड गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
संजय काकडे यांची वाहने गजा मारणेच्या रॅलीत होती अशी माहिती आहे

मोठी बातमी: कुख्यात गुंड गजा मारणे प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
संजय काकडे यांची वाहने गजा मारणेच्या रॅलीत होती अशी माहिती आहे
पुणे:- बारामती वार्तापत्र रिपोर्ट
कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा कारागृहातून काढलेल्या मिरवणुकीप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गजा मारणेच्या मिरवणुकीत संजय काकडे यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. संजय काकडे यांची वाहने गजा मारणेच्या रॅलीत होती अशी माहिती आहे. याच रॅलीच्या संदर्भात संजय काकडे यांना अटक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संजय काकडे यांना आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. शिवाजी नगर कोर्टात हजर केल्यानंतर, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अधिक माहिती देतील, असं सांगण्यात येत आहे.
कोण आहे गजा मारणे?
गजा उर्फ गजानन मारणे हे पुण्यातील कुख्यात मारणे टोळीचा म्होरक्या. कोथरुडसह पुण्यात त्याची दहशत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात त्याच्याविरोधात 24 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा मारणे याने टोल न भरणे तसंच दहशत पसरवणे तसं वातावरण तयार करणे, असे गुन्हे मिरवणुकीनंतर गजा मारणेवर दाखल झाले. एकंदरित ही मिरवणूक त्याला चांगलीच महागात पडली.
संजय काकडे कोण आहेत?
संजय काकडे हे भाजप पुरस्कृत राज्यसभेचे खासदार होते. एप्रिल 2014 मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भाजपच्या मदतीने विजयी झाले होते. काकडे हे बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आहेत. ‘संजय काकडे ग्रुप’ असे त्यांच्या बांधकाम कंपनीचे नाव आहे. आपल्या ‘राजकीय भविष्यवाणी’मुळे ते कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. संजय काकडे यांचे सर्वपक्षीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहेत.