म्हणून ते पुडी सोडायचं काम करतात… अजित पवारांचा चंद्रकांत पाटिल यांना टोला.
भाजप नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं

म्हणून ते पुडी सोडायचं काम करतात… अजित पवारांचा चंद्रकांत पाटिल यांना टोला.
भाजप नेत्यांना असह्य झालंय. त्यांना आपण सरकारमध्ये नाही हे सतत बोचत असतं
बारामती वार्तापत्र
ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, अशी नवी गर्जना करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी विचारला.
प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, चंद्रकांत पाटील स्वतः झोपेत असताना बोलले की, जागे असताना बोलले. ज्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्या दिवसापासून त्यांना असह्य वाटत आहे. जास्त जागा येऊनही आपण सत्तेत नाही. या गोष्टीची त्यांना बोचणी लागली आहे. तसेच त्यांचे कार्यकर्ते फुटू नयेत यासाठी सतत ते पुड्या सोडण्याचे काम करतात, अशी टीका पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले की, सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयातून हे सरकार उभे राहिले आहे. जोपर्यंत हे तिघे निर्णयाच्या बरोबर आहेत तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल, असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
महाविकास आघाडी सरकारला 18 महिने बोनसमध्ये मिळाले आहेत. आता लोकं झोपत असताना कधीही सरकार पडेल, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 18 महिन्यांपुर्वी सरकार आल्यापासून कुठल्याही क्षणी जाईल यासाठी बॅग भरुन तयार असतानाही 18 महिने त्यांना सरकार मिळाले आहे. यामध्ये कोविड एक भाग आहे तसेच कदाचित त्यांचे नशीबही असेल. देवेंद्र फडणवीस जसे म्हणतात की, दादा झोपेतून उठल्यावर सरकार गेले होते. इतक्या अचानक गेले.. केसाने गळा कापणे म्हणतात तसे.. तसेच आताही झोपेत असताना सरकार जाईल, चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील पत्रकारपरिषदेत म्हटले होते.