यंदाची मोरोपंत वक्तृत्व आणि वादविवाद होणार ऑनलाईन
21,22 जानेवारी तु.च. महाविद्यालयामध्ये सुरुवात
यंदाची मोरोपंत वक्तृत्व आणि वादविवाद होणार ऑनलाईन
21,22 जानेवारी तु.च. महाविद्यालयामध्ये सुरुवात
बारामती वार्तापत्र
तरुणांच्या विचारांचे आणि वक्तृत्व कलेचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा होय. कोरोनाच्या निर्बंधामुळे यंदा ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. मोरोपंत स्पर्धा 21 आणि 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे.
स्पर्धेचे हे 48 वे वर्ष आहे. बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आणि बारामती नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली जाते.
कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 21 जानेवारी रोजी होणार आहे. बारामती नगरपरिषदेच्या पुढाकाराने 1972-73 साली ही स्पर्धा सुरु करण्यातआली.
बारामतीच्या नावलौकिकात मोलाची भर घालणा-या कविवर्य मोरोपंतांचे स्मरण व्हावे हा उद्देश स्पर्धा भरवण्यात मागे आहे. दोन दिवस चालणा-या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय गटामध्ये वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत तर दुस-या दिवशी वादविवाद स्पर्धा आणि उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे.
गेल्या 47 वर्षांपासून निष्पक्ष निकाल आणि स्पर्धेच्या विषयांचे ताजेपणा यामुळे ही स्पर्धा महाराष्ट्रभर नावाजली जातेय. तर शांततेचा संदेशदेणा-या जैन धर्माचे वेगळेपण तसेच शारदीय कंठमणी मोरोपंत हेही विषय देण्यात आले आहेत.
तसेच शेतकरी आंदोलनः माझे चिंतन, राजकारणाची एशीतैशी, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मनोरंजनाचे नवे विश्वः माझा मोबाईल स्क्रीन, यासारखे विषय कनिष्ठ महाविद्यालय गटासाठी दिलेले आहेत.
वरिष्ठ महाविद्यालय गटासाठी मोरोपंतांच्या श्लोककेकावलीतील सौंदर्यस्थळे, राष्ट्रसंत तरुणसागर महाराजः एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व, नवे शैक्षणिक धोरणः माझ्या अपेक्षा, सत्ताकारणातील उत्तरदायित्व, कोरोनाः वैश्विक महागुरु, ऑनलाईन माध्यमः शिक्षणाचा नवा अविष्कार, कला प्रवासातील बदलत्या शैली यासारखे वकृत्वाचा कस लागणारे विषय देण्यात आले आहेत. वाद-विवाद स्पर्धेसाठी ‘भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत भारतीय स्वतंत्र झाला आहे’ या विषयाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
कविवर्य मोरोपंत आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेच्या विजेत्यांची नावे स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी जाहीर करण्यात येणार आहे.
पारितोषिकांचे वितरणाचा कार्यक्रम यथावकाश घेण्यात येणार आहे. अशी माहिती स्पर्धेच्या कार्याध्यक्षा आणि मराठी विभाग प्रमुख डॉ.रंजना नेमाडे यांनी दिली आहे.