इंदापूर

राजधानी दिल्लीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट

साखरेची विक्री किंमत ३४०० रुपये करण्याची केली मागणी

राजधानी दिल्लीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट

साखरेची विक्री किंमत ३४०० रुपये करण्याची केली मागणी

इंदापूर : प्रतिनिधी

केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी ) तात्काळ रू.३४०० करावी, साखरेच्या लवकर निर्यातीसाठी पुरेशा संख्येने मालवाहू जहाज उपलब्ध करून द्यावेत, आदी साखर उद्योगासंदर्भातील मागण्या भाजपचे नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे नवी दिल्ली येथे मंगळवारी (दि.९) भेट घेऊन केल्या.

यावेळी मंत्री दानवे यांचेशी हर्षवर्धन पाटील यांनी साखर उद्योगातील विविध विषयांवरती चर्चा केली व केंद्र सरकारने साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी मदत करावी, अशी मागणी केली.दरम्यान, साखरेची एमएसपी वाढविण्याच्या प्रस्ताव हा सध्या प्रक्रियेत असून साखर उद्योगातील इतर मागण्यासंदर्भातही केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे यावेळी मंत्री रावसाहेब दानवे यांनी चर्चेत स्पष्ट केले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपत आले असून, शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेवर देण्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत रू.३४०० करणे आवश्यक आहे.जर साखरेची विक्री किंमत वाढवली तर शेतकऱ्यांना ऊस बिलाचा परतावा वेळेवर करणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्यासाठी साखर कारखान्यांना साखर विक्रीसाठी कोठा दिला जातो. मात्र सध्या साखरेला फारशी मागणी नसल्याने केंद्र सरकारने साखर कोठ्याचा आढावा घ्यावा. केंद्र सरकारने ६० लाख मे.टन साखर निर्यातीस परवानगी दिली आहे. सदर साखरेची लवकर उचल होण्यासाठी बंदरांच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी केली.तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखाने अडचणीत आलेले आहेत.त्यामुळे एसडीएफ कडून साखर कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्घटन करणे आवश्यक आहे, असे मत या चर्चेत हर्षवर्धन पाटील यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे व्यक्त केले.

दरम्यान, नवी दिल्लीत हर्षवर्धन पाटील हे बुधवारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन इथेनॉल संदर्भातील अडचणींवर चर्चा करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!