राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बारामती येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. राजेश कोकरे यांचा सन्मान
बेटी बचाव अभियानात सक्रीय सहभाग व जनजागृती केल्याने दैनिक नवभारत एक्सेलेन्स अवार्ड

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते बारामती येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. राजेश कोकरे यांचा सन्मान
बेटी बचाव अभियानात सक्रीय सहभाग व जनजागृती केल्याने दैनिक नवभारत एक्सेलेन्स अवार्ड
बारामती वार्तापत्र
बारामती येथील प्रसिद्ध प्रसुती तज्ञ व स्त्री रोगतज्ञ डॉ.राजेश कोकरे यांना त्यांनी केलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल देशातील लोकप्रिय वृत्तपत्र समूह असलेल्या दैनिक नवभारत च्या वतीने एक्सेलेन्स अवार्ड ने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन याठिकाणी सन्मानित करण्यात आले.
डॉ. राजेश कोकरे हे विख्यात प्रसूतीतज्ञ व स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यांचे बारामती येथे डी.बी कोकरे मेमोरियल हॉस्पिटल आहे. एक विख्यात प्रसुती तज्ञ व स्त्री रोग तज्ञ म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक आहे. गेल्या बावीस वर्षांत १५ हजार पेक्षा जास्त प्रसूती व २० हजार पेक्षा जास्त शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या केलेल्या आहेत. भारतातील स्त्री आरोग्य तज्ञांसाठी ट्रेनर ऑफ द ट्रेनर म्हणून त्यांची भारतीय स्त्री आरोग्य संघटनेकडून निवड करण्यात आली आहे.गेली १० ते १२ वर्षापासून डॉ. कोकरे सर यांनी बेटी बचाव अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून मोठी जनजागृती केली आहे.
ॲनिमिया अर्थात रक्तपांढरी या महिलांच्या आजाराविषयी महाराष्ट्रभर जनजागृती केली आहे. त्यांनी केलेल्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने ही घेतली आहे. प्रसूतीमध्ये महिलांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी डॉ. राजेश कोकरे यांनी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप प्रोजेक्ट सुरू केला आहे. टेस्ट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून ग्रामीण भागात अत्यल्प दरात सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत.
शासकीय रुग्णालयांमध्ये महिलांच्या क्रिटिकल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या त्यांनी केलेल्या आहेत.त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील सामाजिक कार्याची दखल घेऊन भारतीय डाक विभागाने त्यांचे छायाचित्र असलेले तिकिट बाजारात आणले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची कामगिरी व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान या कार्याची दखल घेऊन दैनिक नवभारत च्या वतीने त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, नवभारत वृत्तपत्र समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.