राज्यसभेचे खासदार अमरसिंग यांचे निधन.
किडनीच्या आजारामुळे ते गेले काही वर्ष उपचार घेत होते.
राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचं निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू आहे. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ६४ व्या वर्षी अमर सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. केंद्रात काँग्रेसप्रणित यूपीएचं सरकार असताना सिंह यांचं नाव कायम चर्चेत असायचं. मुलायम सिंह यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख असताना अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. मात्र नंतर हे संबंध बिघडले. त्याबद्दल फेब्रुवारी महिन्यात सिंह यांनी माफीदेखील मागितली होती.
गेल्या काही महिन्यांपासून अमर सिंह यांच्यावर सिंगापूरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. ते आयसीयूमध्ये होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. ५ जुलै २०१६ रोजी त्यांची खासदार म्हणून निवड झाली. समाजवादी पक्षापासून दूर गेल्यानंतर त्यांची राजकारणातील सक्रियता कमी झाली होती. प्रकृतीच्या समस्या उद्भवण्यापूर्वी ते भाजपाच्या जवळ गेले होते. देशात यूपीएचं सरकार असताना आणि समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव यांचा शब्द अंतिम समजला जात असताना अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत होते.
१९९६ मध्ये अमर सिंह राज्यसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. २००२, २००८ मध्येही अमर सिंह राज्यसभेवर निवडून गेले. मुलायम सिंह यादव यांच्यासोबत बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते. मात्र गेल्या काही वर्षांत त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली. या प्रकरणी सिंह यांनी याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात एका व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितली.
२०१७ मध्ये समाजवादी पक्षापासून दूर
एकेकाळी मुलायम सिंह यादव यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अमर सिंह २०१७ मध्ये पक्षापासून दूर गेले. समाजवादी पक्षात शिवपाल यादव आणि अखिलेश यादव असे दोन गट पडले. या वादाला अखिलेश यांनी अमर सिंह यांना जबाबदार धरलं. अखिलेश यांनी अनेकदा अमर सिंह यांच्यावर जाहीरपणे टीका केली. त्यानंतर अमर सिंह भाजपाच्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थेला संपूर्ण संपत्ती दान करत असल्याची घोषणा केली होती.