राज्यात सोमवारपासून हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा एकदा खुले होणार आहेत
राज्याच्या पर्यटन विभागाने एसओपी जारी केली असून त्यात अनेक महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
राज्यात सोमवारपासून हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार पुन्हा एकदा खुले होणार आहेत
आधी थर्मल गनशी सामना!; रेस्टॉरंटसाठी ‘या’ आहेत गाइडलाइन्स
मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील रेस्टॉरंटस् आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार दि. ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्टस्, रेस्टॉरंटस् आणि बार सुरू करता येणार आहेत. त्याअनुषंगाने आज पर्यटन संचालनालयामार्फत आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) जारी करण्यात आली आहे
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. करोना संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे रेस्टॉरंटस् (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस, हॉटेल/रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये येण्यापूर्वी आणि आल्यानंतर घ्यावयाच्या दक्षता, अन्न आणि पेयपदार्थ तयार करणे आणि त्याची सेवा देताना घ्यावयाच्या दक्षता, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना द्यावयाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण, ग्राहकांना सेवा देताना घ्यावयाची दक्षता, बारमध्ये घ्यावयाच्या दक्षता, किचनमध्ये घ्यावयाच्या दक्षता, सुक्या आणि ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्टाफ एरियासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे, कर्मचाऱ्यांची वाहतूक, कर्मचाऱ्यांच्या गणवेशासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे, कर्मचाऱ्यांची खानपान सुविधा, एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये करोना लक्षणे आढळल्यास किंवा करोनाबाधित आढळल्यास तातडीने करावयाची कार्यवाही अशा विविध मुद्द्यांसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा समावेश एसओपीमध्ये करण्यात आला आहे. आस्थापनांसमवेत झालेल्या चर्चा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, डब्ल्यूएचओ, युएनडब्ल्यूटीओ, केंद्रीय पर्यटन मंत्रालय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच एफएसएसएआय यांनी करोनाकाळात अन्नसुरक्षेबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे ही एसओपी तयार करण्यात आली आहे.
अशा आहेत मार्गदर्शक सूचना…
– करोनाच्या लक्षणासंदर्भात सर्व ग्राहकांची प्रवेशद्वारापाशी थर्मल गनसारख्या उपकरणाद्वारे तपासणी करण्यात यावी. लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात यावा.
– सेवा देताना किंवा प्रतीक्षा करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांनी मास्क परिधान केलेला असेल तरच त्यांना प्रवेश देण्यात यावा. – खानपानाशिवाय इतर वेळी ग्राहकांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार ग्राहकांची माहिती आरोग्य विभाग किंवा प्रशासनास देण्याबाबत त्यांची नाहरकत घेण्यात यावी.
– संबंधित आस्थापना चालकांनी ग्राहकांसाठी हँड सॅनिटायजर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी ते उपलब्ध करण्यात यावेत. – डिजिटल माध्यमाद्वारे चलन देण्यास प्रोत्साहन द्यावे. रोख चलनव्यवहार असल्यास चलनाची हाताळणी काळजीपूर्वक करावी.
– रेस्टरुम आणि हात धुण्याच्या जागांची (वॉशरूम) वेळोवेळी स्वच्छता (सॅनिटाइज) करण्यात यावी. काऊंटरवर कॅशिअर आणि ग्राहकांमध्ये शक्यतो प्लेक्सिग्लास स्क्रीन असावे.
– शक्य असल्यास प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग ठेवावेत. शक्य असल्यास दारे-खिडक्या खुल्या ठेवून शुद्ध हवा आत येऊ द्यावी, एसीचा वापर टाळावा. एसी वापरणे अनिवार्य असल्यास त्या यंत्रणेचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
– सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असाव्या. क्युआर कोडसारख्या माध्यमातून संपर्करहीत मेन्यूकार्ड उपलब्ध करावे. कापडाच्या नॅपकिनऐवजी चांगल्या दर्जाच्या विघटनशील पेपर नॅपकिनचा वापर करावा.
– टेबलांच्यामध्ये किमान १ मीटर अंतर राहील याप्रमाणे रेस्टॉरंट, बार यांच्या रचनेमध्ये आवश्यक बदल करण्यात यावा. ग्राहकाच्या मागणीनुसार बाह्यबाजू निर्जंतुक केलेली पाण्याची बाटली किंवा फिल्टर केलेले पाणी उपलब्ध करावे.
– मेन्यूमध्ये शक्यतो शिजवलेल्या पदार्थांचा समावेश असावा. शक्य असल्यास सलाडसारखे कच्चे पदार्थ, थंड पदार्थ टाळावेत. बुफे सेवा देण्यास परवानगी नसेल.
– प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर त्या जागेचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. टेबल, खुर्च्या, काऊंटर आदी जागांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
– जिथे शक्य असेल तिथे मेन्यूमध्ये प्री-प्लेटेड डिशेसना प्रोत्साहन देण्यात यावे. प्लेटस्, चमचे आदी सर्व भांडी गरम पाण्यात आणि संमत असलेल्या मान्यताप्राप्त डिसइन्फेक्टंटनी (जंतुनाशक) धुवावीत. सेवा देण्याच्या वस्तु, भांडी ही वेगवेगळी आणि सॅनिटाइज केलेल्या कपबोर्डमध्ये ठेवावीत. भांडी आणि अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठी वेगवेगळे वॉर्मर्स वापरावेत. ग्राहकांनी वापरलेली भांडी एका बाजूला जमा न करता ती तातडीने धुण्यासाठी न्यावीत.
– कॉन्टॅक्ट ट्रेसिंगच्या अनुषंगाने ग्राहकाचे नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल आदी माहिती घेण्यात यावी.
– करमणुकीच्या लाइव्ह कार्यक्रमास मनाई असेल. तसेच बिलीयर्डस, डार्टस्, व्हिडिओ गेम्स यास मनाई असेल. इनडोअर आणि आऊटडोअर कार्ड रुमलाही मनाई असेल.
– सर्व आस्थापनांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमित कोविड चाचणी करणे अत्यावश्यक आहे. एन ९५ किंवा त्याच दर्जाचा मास्क कर्मचारी वापरतील, याची खात्री करावी.
– परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवसातून दोनवेळा परिसर सॅनिटाइज करावा. सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करण्यात यावे.
– ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे. आस्थापना चालकांनी सेवा देताना करोना रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत तसेच वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे.