
राधा खुडेंचा इंदापूर येथे सन्मान
अनेकांकडून तोंड भरून कौतुकाचा वर्षाव
इंदापूर : प्रतिनिधी बारामती वार्तापत्र
कलर्स वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवाच्या मंचावरून आपल्या पहाडी आवाजाने अवघ्या महाराष्ट्रातील रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या कु.राधा दत्तू खुडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्या निमित्ताने गुरुवारी ( दि.२४ ) रोजी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सदस्य महेंद्र रेडके व अमोल इंगळे मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर पंचायत समिती सभागृहात छोटेखानी कार्यक्रमात यथोचित सन्मान करण्यात आला.
राधाला सन्मानित करतेवेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले की,इंदापूर तालुका हा क्रीडा क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर होताच परंतु राधा खुडे हिच्या रूपाने सांस्कृतिक क्षेत्रासुद्धा अग्रेसर झाला आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्याचे नाव अवघ्या महाराष्ट्रात हलगीच्या निनादाप्रमाणे गाजत आणि वाजत आहे.
प्रसंगी बोलताना राधा खुडे म्हणाली की,वाहिनीवरील गीत-गायनाचे कार्यक्रम पहात असताना माझ्या आई वडिलांनी स्वप्न रंगवलं होत की माझी राधा या मंचावर दिसेल ते स्वप्न आज पूर्ण झालं आहे.त्यामुळे माझ्याकडून त्यांना छोटीशी भेट भेटती आहे,त्याचा आनंद खूप आहे.
यावेळी महेंद्र रेडके यांनी राधा खुडेंना ११ हजार रुपये आर्थिक मदत केली तसेच तेज पृथ्वी ग्रुपचे नाना खरात यांनी राधा ला येथून पुढील काळात आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली.
दरम्यान उपस्थितांनी राधा ला रंगनांग रंगनांग पुढं बाई हलगी वाजती गाणं एकवण्याची विनंती केली.व राधा हिने सुद्धा आपल्या पहाडी आवाजाने उपस्थितांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध केले.