रामकृष्ण परमहंस जयंती निमित्त
कालीमातेचे महान उपासक रामकृष्ण परमहंस !
बारामती वार्तापत्र
रामकृष्ण परमहंस म्हणजे गदाधर यांचा जन्म बंगालमधील कामारपुकुर या गावात18 फेब्रुवारी वर्ष 1836 मध्ये झाला. गदाधरच्या वडीलांचे नाव क्षुदिराम चतर्जी, आईचे नाव चंद्रामणीदेवी. लहानपणापासून त्याला शालेय शिक्षणात त्यांना विशेष रुची नव्हती. शाळेत शिकण्याचा विषय काढला, तर गदाधरांनी म्हटले, ‘मला भातभाकरीची विद्या नको, ईश्वरदर्शन होईल अशी विद्या हवी’. देवपूजा, भजन, सत्संग यांची आवड होती. तरुण वयात दक्षिणेश्वर येथे राहून त्यांनी कालीमातेची उपासना केली. 1843 साली पितृनिधनानंतर परिवाराचा भार त्यांचे थोरले भाऊ रामकुमार यांनी स्वीकारला. या घटनेचा गदाधराच्या मनावर खोल परिणाम झाला. 1855 साली कलकत्त्याच्या अस्पृश्य कैवर्त समाजातील एका धनिक जमीनदार पत्नी राणी रासमणीने दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले. 1856 साली रामकुमारांच्या मृत्यूनंतर गदाधरांनी त्यांची जागा घेतली. रामकुमारांच्या मृत्यूनंतर रामकृष्णांची भावतन्मयता आणखी वाढली. कालीस ते आई व विश्वजननीभावाने पाहू लागले. या काळात ते देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी व्याकूळ झाले.
त्यांचे गुरु तोतापुरी महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून गदाधर ‘परमहंस’ पदाला प्राप्त झाले. याच गदाधरांना लोक ‘रामकृष्ण परमहंस’, या नावाने ओळखू लागले. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही आपल्या हृदयात असल्याचे ते सांगत. सहस्रो जणांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. त्यातील काही पाश्चिमात्त्य देशांतीलही होते. त्यांच्या कार्याची धुरा स्वामी विवेकानंद यांनी समर्थपणे पेलली. 1859 मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी जयरामवाटी येथील रामचंद्र मुखोपाध्याय यांची पाच वर्षांची कन्या शारदामणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पण लौकिक अर्थाने त्यांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. पुढे शारदामणी यांनी श्रीरामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्त्व स्विकारले आणि त्या शारदा देवी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या.
साधना : श्रीरामकृष्ण परमहंस यांंची ईश्वरभक्ती उत्कट होत चालली. मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्री जात आणि ध्यानधारणा करीत. रात्र व दिवस यांचे भान नष्ट होत असे. ‘आई, दर्शन दे’ असा आक्रोश ते करत असत. अशा वेळी तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे. अखेर एके दिवशी आवेगाच्या भरात गाभाऱ्यातील कालीमातेचे खड्ग घेतले व ते मानेवर चालवणार, एवढ्यात जगन्मातेचे दर्शन त्यांना झाले. यानंतरचे त्यांचे सारे दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले. विवाहानंतर पुन्हा त्यांनी मंदिराचे कामकाज पाहायला सुरुवात केली. 16 ऑगस्ट 1886 या दिवशी कोलकाता येथे श्रीरामकृष्ण परमहंस यांनी देहत्याग केला.
श्रीरामकृष्ण परमहंस यांनी अन्य रूपांतील दैवी तत्त्व आणि भक्तीच्या विविध पद्धती जाणून घेण्यासाठी केलेले प्रयत्न !
1. श्रीरामाच्या दर्शनासाठी हनुमानाप्रमाणे ध्यास लागणे – रामकृष्ण अन्य रूपांतील दैवी तत्त्व आणि भक्तीच्या विविध पद्धती जाणून घेण्यासाठी पुढे जात राहिले. रामायणामध्ये श्रीरामाच्या दर्शनासाठी हनुमानाला ध्यास लागला होता, तसा त्यांनाही लागला. जेव्हा रामकृष्णांनी हनुमानाप्रमाणे श्रीरामाला अनुभवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या भक्तीमध्ये ते इतके तीव्रतेने गुंतले की, त्यांनी माकडाची लक्षणे आत्मसात करण्यास आरंभ केला. शेवटी त्यांना श्रीरामाचे दर्शन झाले.
2. गोपींप्रमाणे श्रीकृष्णाच्या दर्शनाची इच्छा होणे – ‘भगवान कृष्णासमवेत रहातांना आणि त्याची भक्ती करतांना गोपींना त्याच्या दर्शनाची इच्छा होत असे, त्याप्रमाणे रामकृष्णांना श्रीकृष्णाच्या दर्शनाची इच्छा झाली. एका स्त्रीच्या दृष्टीकोनातून श्रीकृष्णाची भक्ती करतांना ते स्त्रीप्रमाणे दिसू आणि वागू लागले. त्यांचे वर्तन आणि दिसणे इतके स्त्रीप्रमाणे झाले की, इतर त्यांना प्रत्यक्षात स्त्री मानू लागले. त्यांनी स्वतःमध्ये एका स्त्रीप्रमाणे श्रीकृष्णाच्या दर्शनाची ओढ जागृत केली आणि शेवटी त्यांना श्रीकृष्णाच्या दर्शनाचा लाभ झाला.’
आपणही भगवंताविषयी प्रयत्नपूर्वक भाव वाढवून देवाच्या अनुसंधानात राहू शकतो. भाव वाढवण्यासाठी मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर सतत कृती करत राहिल्यास, भाव निश्चितपणे वाढतो. कालीमातेचे महान उपासक ‘रामकृष्ण परमहंस’ यांच्या पावन चरणी अनंत कोटी कृतज्ञता !
संकलक : श्री. हिरालाल तिवारी, सनातन संस्था