राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनाही चिमटा ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’
पेट्रोल पंप 'गुडमॉर्निंग अण्णा' बोलतोय तर गॅस सिलेंडर 'आमच्यासाठी आंदोलन कधी?'

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनाही चिमटा ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’
पेट्रोल पंप ‘गुडमॉर्निंग अण्णा’ बोलतोय तर गॅस सिलेंडर ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
देशात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यातच आता LPG गॅसचे दर 25 रुपयांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका सुरु केलीय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनाही चिमटा काढलाय. पेट्रोल पंप ‘गुडमॉर्निंग अण्णा’ बोलतोय तर गॅस सिलेंडर ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न शेजारी बसलेल्या अण्णा हजारे यांना विचारत असल्याचे व्यंगचित्र काढत क्लाईड क्रास्टो यांनी अण्णा हजारेंना फटकारलंय.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एवढ्या दिवसात कधी तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही, असा आरोप क्रास्टो यांनी केलाय. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून चांगलं काम करणाऱ्या राज्य सरकारच्याविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून अण्णा हजारे यांना वाढत्या पेट्रोल – डिझेल व गॅसच्या दरवाढीवर जोरदार चिमटा काढलाय.
हे व्यंगचित्र अण्णांना पेट्रोल पंप गुडमॉर्निंग अण्णा बोलून जागा करत आहे. तर चक्क गॅस सिलेंडरच ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न करत आहे. क्लाईड क्रास्टो यांच्या कुंचल्यातून रेखाटलेल्या व्यंगचित्रातून आतातरी अण्णा हजारे बोध घेतील का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विचारत आहेत.
मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’!
“केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू आहे. जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे”, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.
‘जीवघेणी महागाई आता त्यांना ‘डार्लिंग’ वाटत आहे’
‘केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना महागाईची झळ सामान्य जनतेला पोहचू नये यासाठी इंधन आणि गॅसवर सबसिडीच्या रुपाने मदत दिली जात होती. ज्याचा लाभ जनतेला होत होता, ती मदतही मोदी सरकारने आता पूर्णपणे बंद केली आहे. यूपीए सरकारवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता हीच जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे’.
‘जनताच आता भाजपा व मोदींना त्यांची जागा दाखवेल’
2014 साली खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकरी, कामगार, सामान्य जनतेसह मध्यमवर्गांचे जगणेही मुश्कील करुन ठेवले आहे. काँग्रेस सरकारने उभे केलेले प्रकल्प विकण्याचा एकमात्र उद्योग गत सात वर्षांपासून धडाक्यात सुरु आहे. सरकारी कंपन्या, बँका, विमा, रेल्वे सर्वकाही उद्योगपती मित्रांच्या हवाली करुन देशाचे वाट्टोळे करण्याचे काम सुरु आहे. देशातील जनता मोदी सरकारच्या या कारभाराला कंटाळली असून महागाईवरुन जनतेत प्रचंड आक्रोश आहे, ही जनताच आता भाजपा व मोदींना त्यांची जागा दाखवेल, अशी टीकाही पटोले यांनी मोदी सरकारवर केलीय.